
पॅन कार्ड आज फक्त कर भरण्यासाठीच उपयोगात येते असे नाही. आजघडीला पॅनकार्डचा खूप सारा उपयोग आहे. बँकेत खाते खोलायचे असो किंवा एखादा मोठा व्यवहार करायचा असो तुमच्याकडे पॅनकार्ड असणे गरजेचे आहे. एखाद्या शासकीय योजनेचा फायदा घ्यायचा असल्यास तुम्हाला पॅनकार्ड लागते.

ऐन वेळी तुमच्याकडे पॅनकार्ड नसेल तर तुमचे सगळे काम खोळंबते. तुम्ही लगेच ऑनलाईन अप्लाय केले तरी ते तुम्हाला लगेच मिळत नाही. त्यासाठी निश्चित कालावधी लागतो. परंतु भविष्यात अशी अडचण येणार नाही. कारण तुम्हाला आता प्राप्तिकर विभागातर्फे इन्स्टंट पॅन कार्डची सुविधा देण्यात आली आहे.

इन्स्टंट पॅन कार्ड तुम्हाला अवघ्या पाच मिनिटांत मिळते. विशेष म्हणजे हे पॅन कार्ड एकदा मिळाले की तुम्ही त्याचा वापर आयुष्यभर करू शकता. प्राप्तिकर विभगााच्या संकेतस्थळावर तुम्हाला या इन्स्टंट पॅन कार्डसाठी अर्ज करता येतो. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन असते. प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पुढच्याच काही मिनिटांत तुम्हाला पॅनकार्ड मिळते.

प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळावर तुम्हाला ई-केवायसीच्या माध्यमातून लगेच इन्स्टंट पॅनकार्ड दिले जाते. आधार कार्डवर असलेली तुमची माहिती घेऊन सरकार तुम्हाला हे इन्स्टंट पॅनकार्ड देते. सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एक ई-पॅन जनरेट होते. हे पॅन डाऊनलोड करून तुम्हाला लगेच त्याचा वापर करता येतो.

अनेकदा तुम्हाला पॅनकार्ड काढायचे असेल तर एजंट पैसे मागतात. परंतु तुम्हाला इन्स्टंट पॅनकार्ड काढायचे असल्यास कोणालाही पैसे देण्याची गरज नाही. पाच मिनिटांत तुम्ही हे पॅनकार्ड काढू शकता. त्याला डाऊनलोड करून तुम्हाला ते वापरता येते.