
उन्हाळ्याची चाहूल लागली की अनेकजण आईस्क्रिम, सरबत, कोल्ड ड्रिंक्स यांसह इतर थंड पदार्थांवर तुटून पडतात. उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असल्याने सर्वजण वैतागल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या थंड पदार्थांची मागणी सातत्याने वाढत असते. पण नुकतंच इगतपुरी पोलिसांनी एका जीवघेण्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

नाशिकच्या इगतपुरीच्या चर्च हिल परिसरात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या एका बनावट कुल्फी कारखान्यावर इगतपुरी पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने (FDA) संयुक्त धाड टाकत मोठा घोटाळा उघडकीस आणला आहे.

मानवी आरोग्यास, विशेषतः लहान मुलांसाठी अत्यंत घातक असलेल्या पोस्टर कलरचे म्हणजे चित्रकलेचे रंग वापर करून येथे कुल्फी तयार केली जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

चर्च हिल सारख्या गजबजलेल्या भागात एका बंदिस्त जागेत विनापरवाना कुल्फी बनवण्याचे काम सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाला पाचारण केले.

गुरुवारी दुपारी या संयुक्त पथकाने अचानक धाड टाकली असता अत्यंत अस्वच्छ वातावरणात सुरू असलेला हा प्रकार पाहून अधिकारीही चक्रावून गेले. यावेळी तपासणीदरम्यान प्रशासनाला घटनास्थळी १५ पोस्टर कलरचे डब्बे, दोन चॉकलेट फ्लेवर कलरचे डब्बे आणि एक अनधिकृत इसेन्सची बाटली आढळून आली.

धक्कादायक बाब म्हणजे, कुल्फीला आकर्षक आणि गडद रंग देण्यासाठी खाण्यायोग्य रंगांऐजी (Food Color) चक्क चित्रकलेसाठी वापरल्या जाणाऱ्या रंगांचा वापर केला जात होता. या रासायनिक रंगांमुळे कर्करोगासारखे गंभीर आजार उद्भवू शकतात.

यावेळी सुमारे २५०० बनावट कुल्फी जप्त करून त्या तातडीने एका निर्जनस्थळी नष्ट करण्यात आल्या. या कुल्फींची विक्री तालुक्यातील दुर्गम खेड्यापाड्यांत आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये फिरत्या विक्रेत्यांमार्फत केली जात होती.

अन्न व औषध प्रशासनाने या ठिकाणचे विविध नमुने सील केले असून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित मालकावर कठोर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे. तोपर्यंत हा कारखाना पूर्णपणे बंद ठेवण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी उघड्यावर मिळणारे किंवा संशयास्पद वाटणारे स्वस्त थंड पदार्थ विकत घेऊ नये, असे आवाहन इगतपुरी पोलिसांनी केले आहे.