
इराण-अमेरिका-इस्रायलमधील युद्धामुळे भारतात एलपीजी गॅसची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना झगडावे लागत आहे.

अनेक घरांमध्ये आता गॅससोबतच इंडक्शन कुकटॉप्सचा वापर वाढला आहे. त्यामुळे इंडक्शन वापरताना नेमकी किती वीज वापरली जाते आणि खिशावर किती भार पडतो, हे समजून घेणे आवश्यक आहे.

इलेक्ट्रॉनिक्स विक्रेत्यांच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून इंडक्शन खरेदी करणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. गॅस सिलेंडर संपल्यानंतर किंवा जर डिलिव्हरीला उशीर झाला तर स्वयंपाकात अडथळा येऊ नये, म्हणून अनेकजण पर्यायी व्यवस्था म्हणून इंडक्शनला पसंती देताना दिसत आहेत.

इंडक्शनवर अन्न लवकर शिजते. गॅस स्टोव्हच्या तुलनेत ते वापरणे आणि स्वच्छ करणे अत्यंत सोपे आहे. यासाठी केवळ वीजपुरवठा असेल तर ते कधीही वापरता येते, म्हणूनच अनेक कुटुंबांच्या स्वयंपाकघरातील तो आता अविभाज्य भाग बनला आहे.

इंडक्शन वापरल्याने वीज बिल किती वाढेल, असा प्रश्न अनेकांना पडतो. विजेचा वापर हा तुम्ही किती वॅटचे उपकरण वापरता यावर अवलंबून असतो. बाजारात साधारणपणे १२०० वॅट, १५०० वॅट आणि २००० ते २२०० वॅट्सचे इंडक्शन मॉडेल्स उपलब्ध आहेत.

जर तुम्ही २००० वॅटचे इंडक्शन पूर्ण क्षमतेने एका तासासाठी चालवले, तर साधारण २ युनिट वीज खर्च होते. जर १२०० वॅटचे इंडक्शन एका तासासाठी चालवले, तर सुमारे १.२ युनिट वीज वापरली जाते.

महाराष्ट्रात विजेचे दर हे वापराच्या टप्प्यानुसार (Slabs) आणि वीज वितरण कंपनीनुसार महावितरण, अदानी, टाटा पॉवर यांचे वेगवेगळे असतात. महाराष्ट्रात घरगुती वापरासाठी प्रति युनिट दर साधारण ५ रुपयांपासून ते १२ रुपयांपर्यंत (काही ठिकाणी स्थिर आकार आणि अधिभारासह अधिक) असू शकतात.

त्यामुळे, जर तुम्ही १ तास २००० वॅटचे इंडक्शन वापरले आणि २ युनिट वीज खर्च झाली, तर महाराष्ट्रातील सरासरी दराप्रमाणे तुम्हाला एका तासासाठी १० ते २४ रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. तुमच्या घराचा वीज वापर कोणत्या स्लॅबमध्ये येतो, यावर हा अचूक खर्च अवलंबून असेल.