
मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स हा सामना कोणीही जिंको, पण प्रश्न हा आहे की, हिरो कोण बनला? या प्रश्नाचं उत्तर आहे जसप्रीत बुमराह. त्याने एकट्याने फक्त 10 धावा देत पाच विकेट काढल्या. निर्धाव मेडन ओव्हर टाकून एकाच षटकात तीन विकेट काढल्या. T 20 क्रिकेटमध्ये असं कमीच पहायला मिळतं.

बुमराहने कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध 10 धावा देऊन पाच विकेट काढल्या. आयपीएलमध्ये गोलंदाजाने मुंबईसाठी केलेलं हे दुसरं सर्वोत्तम प्रदर्शन आहे. याआधी 2019 मध्ये अल्जारी जोसेफने सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध 12 धावा देऊन 6 विकेट काढल्या होत्या.

मुंबई इंडियन्सने हा सामना गमावला. पण बुमराहला त्याच्या सर्वोत्तम प्रदर्शनामुळे सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. याआधी 2016 साली एडम झंपाने रायजिंग पुणे सुपर जायंट्ससाठी 19 धावा देऊन 6 विकेट काढल्या होत्या. पुण्याचा त्यावेळी सनरायजर्स हैदराबादने पराभव केला होता.

जसप्रीत बुमराह दुसरा असा गोलंदाज आहे, ज्याने सर्वात कमी धावा देऊन पाच विकेट घेतल्या. त्याच्याआधी 2009 साली अनिल कुंबळेने राजस्थान रॉयल्स विरुद्ध पाच धावा देऊन पाच विकेट घेतल्या होत्या.

केकेआर विरुद्ध जसप्रीत बुमराहने पाच विकेट शॉर्ट चेंडू किंवा शॉर्ट ऑफ गुड लेंथ चेंडूवर घेतले आहेत. ESPN Cricinfo नुसार, आयपीएलमध्ये पहिल्यांदाच एका गोलंदाजाने या लेंथवर गोलंदाजी करुन विकेट घेतल्या आहेत. मुंबई इंडियन्ससाठी पाच विकेट घेणारा बुमराह पाचवा गोलंदाज आहे.