
कोकणातील रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील खेड आणि नागोठणे शहरांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. खेडमधील जगबुडी नदीने आणि नारंगी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. आता नदीचे पाणी मार्केट परिसरात शिरले आहे.

खेडमध्ये जगबुडी नदीचे पाणी मटण मार्केटमध्ये शिरण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. खेड नगरपरिषद प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रायगड जिल्ह्यात १३४ मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आला आहे. रायगडमधील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. अलिबाग, रोहा ,तळा, महाड पोलादपूर या तालुक्यांत मागील काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे.

पुण्यात पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. पुण्यात सुरू असलेल्या पावसामुळे मुठा नदीच्या पाण्यात वाढ झाली आहे. मुठा नदीपात्रात असणाऱ्या मंदिरांना पाण्याचा वेढा पडला आहे. धरणातून पाणी सोडण्यात येत असल्यामुळे पाण्याची पातळी वाढू शकते.

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. यामुळे नागरिकांना सायरन वाजवत अलर्ट देण्यात आला आहे. नदीपात्राजवळ राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेकडून नदीपात्रांमध्ये सायरन बसवण्यात आला आहे.