
मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित गणपतींपैकी एक म्हणून लालबागचा राजा प्रसिद्ध आहे. यंदाच्या गणेशोत्सवासाठी लालबागचा राजा सज्ज झाला आहे. काही दिवसांपूर्वी लालबागचा राजाचा फर्स्ट लूक समोर आला होता.

आता भाविकांना लाडक्या बाप्पाचे दर्शन बुधवारपासून घेता येणार आहे. यंदा लालबागचा राजा गणेशोत्सवाच्या तयारीमध्ये एका विशेष आकर्षण पाहायला मिळत आहे. यंदा लालबागच्या राजाचा दरबार तिरुपती बालाजीच्या सुवर्णराज मुकुटात बसवण्यात आला आहे.

यासाठी खास सुवर्ण गजानन महल साकारण्यात आला आहे. लालबागच्या राजाची यंदा मुर्ती सोन्याच्या दागिन्यांनी मढलेली आहे. यंदा प्रथमच राजाच्या दरबाराची उंची तब्बल 50 फूट पर्यंत वाढवण्यात आली आहे, ज्यामुळे हे दर्शन आणखीनच भव्य आणि आकर्षक झाले आहे.

रविवारी लालबागच्या राजाची पहिली झलक समोर आली तेव्हा मूर्तीसमोर मखमली पडदा होता. आता हा पडदा दूर करत गणपती बाप्पाचा पहिला लूक दाखवण्यात आला. आता या पडद्याबद्दलच एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

लालबागच्या राजाचा दरबारात मूर्तीसमोरील मखमखली पडदा मुस्लीम कारागिरांनी शिवला आहे. हा पडदा 50 फूट उंच आणि रुंद आहे. उत्तर प्रदेशमधील मुस्लिम कारागिरांनी हा पडदा शिवला आहे.

गेल्या आठवड्यात चार दिवस अथक मेहनत करून खान चाचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा पडदा तयार केला. या पडद्याचा घेर तब्बल आठ फुटांचा आहे, ज्यामुळे तो आणखीनच भव्य दिसतो.

लालबागच्या राजाच्या मूर्तीसमोरील हा पडदा हिंदू-मुस्लिम सामाजिक ऐक्याचे प्रतीक मानले जात आहे. तसेच यातून श्रद्धेला कोणताही धर्म नसतो हा संदेशही ठळकपणे पाहायला मिळत आहे. यामुळे या उत्सवाचे महत्त्व अधिक वाढले आहे.

दरम्यान गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत 20 हजार पोलिसांचा फौजफाटा सज्ज झाला आहे. गणेशोत्सव काळात संवेदनशील ठिकाणांवर सीसीटीव्ही, ड्रोनद्वारे पोलिसांचा वॉच असणार आहे.