
आपण अनेकदा गरजेच्या वेळी लोकांना पैसे उधार देतो किंवा घेतो. पण काही वेळा तुम्ही एखाद्याला दिलेले पैसे परत मिळत नाहीत किंवा ते मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो, असे अनुभव अनेकदा तुम्हाला आले असतील. यामागे ज्योतिष आणि वास्तुशास्त्रातील काही नियम कारणीभूत असतात.

धार्मिक मान्यतेनुसार, पैसे उधार देण्यासाठी काही विशिष्ट दिवस आणि वेळा अशुभ मानल्या जातात. ज्या काळात केलेल्या व्यवहारामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषीय तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही या काळात कोणालाही पैसे उधार दिले तर ते पैसे अडकण्याची शक्यता असते.

वास्तू नियमानुसार सूर्यास्ताच्या वेळी किंवा त्यानंतर कोणालाही पैसे उधार देणे टाळावे. ही वेळ देवी लक्ष्मीच्या घरात आगमनाची मानली जाते. या काळात पैसे बाहेर देणे म्हणजे घरातून लक्ष्मीला बाहेर पाठवण्यासारखे मानले जाते, ज्यामुळे आर्थिक चणचण वाढू शकते. या काळात दिलेले पैसे अडकतात. ते परत मिळणे अत्यंत कठीण होते.

काही धार्मिक मान्यतांनुसार, सकाळी ४ ते ५ या ब्रह्म मुहूर्तावर आर्थिक व्यवहार टाळावेत. या वेळेत केलेले व्यवहार फलदायी ठरत नाहीत. तसेच आठवड्यातील काही विशिष्ट वार कर्ज देण्यासाठी अशुभ मानले जातात.

बुधवारी पैसे उधार दिल्यास ते पैसे बुडण्याची किंवा त्याची वसुली करताना त्रास होण्याची शक्यता सर्वाधिक असते. या दिवशी आर्थिक व्यवहार टाळावेत. तर गुरुवार हा धन आणि समृद्धीचा कारक असलेल्या देवगुरु बृहस्पतीचा दिवस मानला जातो. या दिवशी कोणाला पैसे उधार देणे म्हणजे लक्ष्मीचा अपमान करण्यासारखे मानले जाते. या दिवशी दिलेले पैसे परत मिळायला खूप अडचणी येतात.

शनिवारी संध्याकाळच्या वेळी केलेले आर्थिक व्यवहारही अशुभ मानले जातात. तसेच मंगळवारी कर्ज घेऊ नये, ते लवकर फिटत नाही. जर तुम्हाला कर्ज फेडायचे असेल तर मंगळवार हा कर्ज फेडण्याचा हप्ता भरण्यासाठी किंवा कर्ज फेडण्यास सुरुवात करण्यासाठी शुभ मानला जातो.

त्यामुळे वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार व्यक्तीने आपली आर्थिक स्थिती चांगली ठेवण्यासाठी आणि दिलेले पैसे परत मिळवण्यासाठी बुधवार, गुरुवार आणि शनिवार हे तीन दिवस आणि तसेच सूर्यास्तानंतर पैसे उधार देणे टाळण्याचा सल्ला दिला जातो.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)