
शिवसेना ठाकरे गटाकडून आज राज्यभरात जनआक्रोश आंदोलन करण्यात येत आहे. मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात शिवसैनिकांकडून जोरदार निदर्शने करण्यात आली.

महायुती सरकारच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे, या मागणीसाठी जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक शिवाजी पार्क परिसरात जमले होते.

यावेळी माझ्या राज्याच्या मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकतो, मला लाज वाटते!, माझ्या राज्याचा मंत्री नोटांच्या बॅगा घेऊन बसतो, मला लाज वाटते! माझ्या राज्याचा मंत्री अघोरी जादू टोणा करतो, मला लाज वाटते! अशा स्वरुपाचे फलक घेऊन शिवसैनिकांनी आंदोलन केले.

तसेच बारच्या सावलीत बसलंय कोण? काळ्या धंद्याचे पुढारी दोन, अशा स्वरुपाचे बॅनरही यावेळी फडकवण्यात आले.

यासोबतच महायुतीच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर आधारित एक लहान, मनोरंजक नाटकदेखील करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात महिला शिवसैनिकही सहभागी होत्या.

महायुतीच्या पाच मंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी ठाकरे गटाने धुळ्यात मोठे आंदोलन केले. ठाकरे गटाच्या कार्यालयापासून जुन्या महापालिकेच्या दिशेने मोर्चा काढत शिवसैनिकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

'भ्रष्टाचारी मंत्र्यांचा निषेध असो', 'डान्सबार चालवणाऱ्या मंत्र्यांचा निषेध असो' आणि 'रमी खेळणाऱ्या मंत्र्यांचा निषेध असो' अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. विशेष म्हणजे, आंदोलकांनी मंत्र्यांच्या पोस्टरला शेण फासून आपला संताप व्यक्त केला.

परभणीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने महायुतीच्या मंत्र्यांविरोधात जोरदार आंदोलन केले. यावेळी, मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि महिलाही उपस्थित होत्या. महायुती सरकारमधील काही मंत्र्यांवर करण्यात आलेल्या आरोपांचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी, आंदोलकांनी घोषणाबाजी करत मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. या आंदोलनात 'जुगाराचा डाव' भरवत अभिनव पद्धतीने सरकारचा निषेध करण्यात आला. या आंदोलनाने परभणीतील राजकीय वातावरण तापले आहे.

जालना शहरात देखील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन सुरू केले. जालना शहरातल्या गांधी चमन परिसरात शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी एकत्र येऊन राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत असल्याचेही पाहायला मिळाले.