
जगभरातील लोकांना भुरळ घालणारा देवगड हापूस मुंबईच्या बाजारात दाखल झालाय. त्यामुळे आंबा प्रमींची बाजारात गर्दी दिसतेय. तर व्यापारी वर्ग देखील हापूस आंब्याची खरेदी मोठ्या प्रमाणात करत आहे.

फळांचा राजा हापूस आंबा मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये दाखल झाला आहे. जानेवारीपासून आजपर्यत मुंबईतल्या वाशी मार्केटमध्ये हापूस आंब्याची 1 लाख पेट्यांची आवक झाल्याची माहिती आहे.

हापूस आंब्यात सर्वात जास्त आंबा हा देवगड हापूसचा आहे. आवक झालेल्या आंब्यांमध्ये 80 टक्के देवगड आणि 20 टक्के रत्नागिरी आणि रायगडचा आंबा आहे.

वाशी मार्केटमधून 10 हजार आंब्याच्या पेट्यांची निर्यात आखाती देशात करण्यात आली आहे. निर्यात झालेला आंबा दुबई, ओमान आणि कुवेत या देशात गेला आहे.

हापूस आंब्याला प्लास्टिक क्रेटमधून बाजारात आणलं जात आहे. याद्वारे आंबा सुरक्षित जाण्याबरोबरच हवा लागत असल्याने फळामध्ये साक्या होण्याचे प्रमाण कमी होईल. पॅकिंग खर्चातही बचत होत असल्याचा बागायतदारांचा अनुभव आहे.