
मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाच्या आलिशान जीवनशैलीची चर्चा नेहमीच होत असते. त्यांचे निवासस्थान अँटिलिया जितके भव्य आहे, तितकीच तिथे वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूची गुणवत्ताही उच्च दर्जाची असते. अंबानींच्या दिवसाची सुरुवात ज्या दुधाने होते, ते दूध साधेसुधे नसून एका रॉयल फार्ममधून येते.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी अँटिलियामध्ये अत्यंत शुद्ध आणि प्रीमियम दर्जाचे दूध पुरवले जाते. हे दूध पुण्याच्या मंचर येथील भाग्यलक्ष्मी डेअरी मधून येते.

प्राईड ऑफ काऊ (Pride of Cows) या ब्रँडने ओळखले जाणारे हे दूध केवळ अंबानीच नव्हे, तर अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांसारख्या अनेक दिग्गजांच्या पसंतीस उतरले आहे.

पुण्याजवळील मंचर येथे ३५० एकर परिसरात पसरलेली भाग्यलक्ष्मी डेअरी ही भारतातील सर्वात आधुनिक डेअरी मानली जाते. येथे ३००० हून अधिक होल्स्टीन-फ्रीजियन (Holstein-Friesian) जातीच्या गायी आहेत, ज्या त्यांच्या उच्च दूध उत्पादन क्षमतेसाठी जगप्रसिद्ध आहेत.

या फार्ममधील गायींना मिळणारी वागणूक एखाद्या पंचतारांकित सुविधेपेक्षा कमी नाही. गायी तणावमुक्त राहाव्यात आणि त्यांनी आनंदाने दूध द्यावे, यासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील शांत संगीत ऐकवले जाते.

शास्त्रोक्त दृष्टिकोनातून संगीत ऐकल्यामुळे गायींच्या दुधाची गुणवत्ता सुधारते, असे मानले जाते. उन्हाळ्याच्या झळा बसू नयेत म्हणून फार्ममध्ये सतत कूलर्स आणि फॉगर्स सुरू असतात. तसेच, गायींना झोपण्यासाठी रबराचे मऊ मॅट्स वापरले जातात.

या गायींचा आहार अत्यंत पौष्टिक आणि रसायणमुक्त असतो. गायींना लागणारा चारा स्वतः फार्मवरच पिकवला जातो. त्यांच्या आहारात सोयाबीन, मका आणि अल्फाल्फा गवताचा समावेश असतो. पिण्यासाठी त्यांना केवळ RO फिल्टर केलेले पाणी दिले जाते.

या दुधाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते काढण्यापासून बाटलीत भरेपर्यंत कुठेही मानवी हातांचा स्पर्श होत नाही. आधुनिक मिल्किंग मशीनद्वारे दूध काढले जाते. दूध काढल्याबरोबर ते थेट पाईप्सद्वारे चिल्लिंग प्लांटमध्ये पाठवले जाते. तिथून काचेच्या बाटल्यांमध्ये सील केले जाते. यामुळे दुधातील पोषक घटक नैसर्गिक स्वरूपात टिकून राहतात.

पुण्याहून मुंबईला हे दूध विशेष रेफ्रिजरेटेड वाहनांतून (Cold Chain) पाठवले जाते. दररोज पहाटे हे दूध निघते आणि काही तासांतच अंबानींच्या निवासस्थानी पोहोचते. शुद्धता आणि गुणवत्तेमुळे या दुधाची किंमत सामान्य दुधापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे.

मुकेश अंबानी यांच्या घरी येणाऱ्या या प्राईड ऑफ काऊ दुधाची किंमत सामान्य दुधाच्या तुलनेत बरीच जास्त आहे. सध्याच्या दरानुसार, या दुधाची किंमत साधारणपणे ९० ते १२० रुपये प्रति लीटर इतकी आहे. काही प्रीमियम श्रेणीतील उत्पादनांसाठी हा दर १५० रुपये प्रति लीटर पर्यंत देखील जातो.