
मुंबईतील पहिला एलिव्हेटेड फॉरेस्ट वॉकवे काल (30 मार्च, रविवार) पर्यटक आणि मुंबईकरांसाठी खुला झाला. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या टूरिस्ट स्पॉटचा एंट्री पॉईट हा दक्षिण मुंबईतील कमला नेहरू पार्क येथे आहे.

मलबार हिलच्या जंगलातून गेल्यावर गिरगाव चौपाटीला लागून असलेल्या अरबी समुद्राचे सुंदर दृश्य इथे पाहायला मिळेल.

मात्र मलबार हिल येथील हा वॉकवे सुरू होण्यापूर्वीच त्याला मोठा दणका बसला. हा वॉकवे सुरू होण्यापूर्वीच तेथील रिसेप्शन काऊंटवर चोरी झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

21 मार्चला चोरीची ही घटना घडली. त्या वॉकवेमधील रिसेप्शन काऊंटरच्या खिडकीतून एक चोर आत घुसला. तिकीट काऊंटरवरील साहित्य त्या चोराने लंपास केलं. ही चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

मलबार हिल वॉक वे परिसरात गर्दुल्ले आणि चोरांचा वावर वाढला आहे. अडीच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मलबार येथील वॉल्क वे महानगर पालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलं.

पण महानगर पालिकेचा महत्वाचा प्रकल्प असलेल्या वॉकवेमध्ये चोरी झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. काम सुरु झाल्यापासूनच या ठिकाणी अनेकवेळा साहित्याची चोरी होत असल्याची माहितीदेखील समोर आली.