
भारतीय संस्कृती आणि परंपरा आजही श्रद्धेने पाळल्या जातात. भारताप्रमाणेच शेजारील देशांमध्येही अनेक अद्भुत आणि प्राचीन मंदिरे आहेत. जी मंदिरे जगभरातील भाविक आणि पर्यटकांना आकर्षित करतात. कधी काळी भारताचा भाग असलेल्या नेपाळमध्ये अनेक प्राचीन मंदिरे आणि बौद्ध स्तूप आढळतात. सध्या भारत आणि नेपाळमध्ये तणावाचे संबंध असले तरी दोन्ही देशांचे संबंध फार जुने आहेत. नेपाळमध्ये भगवान श्रीविष्णूंचे एक असेच प्राचीन मंदिर आहे, जे आपल्या गूढ रहस्य आणि अद्भुततेमुळे आश्चर्यचकित करते.

नेपाळमधील बुदानिलकंठा मंदिर हे अत्यंत रहस्यमय मंदिर आहे. या ठिकाणी दरवर्षी हजारो भारतीय दर्शनासाठी जातात. हे मंदिर अत्यंत रहस्यमय आहे, असे म्हटले जाते. या मंदिरात सामान्य नागरिक पूजा करू शकतात. परंतु नेपाळच्या राजघराण्यातील लोकांना मात्र या मंदिरात पूजा करण्याची परवानगी नाही.

बुदानिलकंठा हे मंदिर नेपाळची राजधानी काठमांडूपासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवपुरी डोंगराच्या कुशीत वसलेले भगवान विष्णूंचे मंदिर आहे. हे प्राचीन मंदिर आपल्या सौंदर्य आणि चमत्कारांमुळे जगभर प्रसिद्ध आहे. हे मंदिर राजघराण्यासाठी शापित आहे. याच शापामुळे राजघराण्यातील लोक बुदानिलकंठा मंदिरात दर्शनासाठी जात नाहीत.

मान्यतेनुसार, राजघराण्यातील कोणताही सदस्य या मंदिरातील भगवान विष्णूंच्या स्थापित मूर्तीचे दर्शन घेतल्यास त्याचा मृत्यू होतो. कारण राजघराण्याला असा शाप मिळालेला आहे. याच कारणामुळे राजघराण्यातील लोक या मंदिरात पूजा-पाठ करत नाहीत.

राजघराण्यातील सदस्यांना पूजा करता यावी यासाठी मंदिरात भगवान विष्णूंची तशीच दुसरी मूर्ती स्थापित करण्यात आली आहे, ज्याची ते पूजा करू शकतात. बुदानिलकंठा मंदिरात भगवान विष्णू एका पाण्याच्या कुंडात ११ नागांच्या फण्यावर शेषशय्येवर विराजमान आहेत.

भगवान विष्णूंची ही काळ्या रंगाची मूर्ती नागांच्या वेटोळ्यांवर स्थित आहे. एका प्रचलित कथेनुसार, एक शेतकरी या ठिकाणी काम करत होता. याच दरम्यान शेतकऱ्याला ही मूर्ती सापडली. १३ मीटर लांबीच्या तलावात असलेली भगवान विष्णूंची ही मूर्ती पाच मीटरची आहे. यावेळी नागांचे फणे भगवान विष्णूंच्या डोक्यावर छत्र म्हणून आहेत.

या मंदिरात भगवान विष्णूंसोबत भगवान शंकराची मूर्तीही आहे. पौराणिक कथेनुसार, समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा विष निघाले, तेव्हा भगवान शंकरांनी या सृष्टीला वाचवण्यासाठी ते विष प्राशन केले. यानंतर भगवान शंकराच्या गळ्यात जळजळ होऊ लागली, तेव्हा त्यांनी ही जळजळ शांत करण्यासाठी डोंगरावर त्रिशूळ मारून पाणी काढले आणि ते पाणी पिऊन आपली तहान भागवली आणि गळ्यातील जळजळ शांत केली.

शिवजींच्या त्रिशूळाच्या प्रहारातून निघालेल्या पाण्याचे एका सरोवरात रूपांतर झाले. याच सरोवराला कलियुगात गोसाईकुंड म्हणून ओळखले जाते. बुदानिलकंठा मंदिरात असलेल्या तलावातील पाण्याचे मूळ स्त्रोत हे कुंड आहे. या मंदिरात दरवर्षी ऑगस्टमध्ये शिव महोत्सवाचे आयोजन केले जाते. असे म्हटले जाते की या काळात या तलावाच्या खाली भगवान शंकराची प्रतिमा दिसते.