Nana Patekar Passes Away : नाना पाटेकर देवळात का नाही जायचे? आठाणे टाकायचे आणि..मनाला भिडणारे नाना पाटेकरांचे शब्द
नाना पाटेकरांचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आला आहे. देव, माणुसकी आणि आयुष्याबद्दल त्यांनी व्यक्त केलेल्या विचारांनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओत नेमकं काय घडलं आणि नानांनी काय सांगितलं? जाणून घ्या…

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. आपल्या दमदार अभिनयासोबतच स्पष्टवक्तेपणा आणि सामाजिक भानासाठी ओळखले जाणारे नाना पाटेकर यांचे अनेक जुने व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत येत आहेत. यातील एका कार्यक्रमातील त्यांचे देव, माणुसकी आणि आयुष्याबद्दलचे विचार विशेष लक्ष वेधून घेत आहेत.
या व्हिडीओमध्ये नाना पाटेकर यांनी आपण देवळात का जात नाही, यामागची आपली भूमिका स्पष्ट केली होती. "देवळात मी जात नाही जाणीवपूर्वक. मनात नाही अशातला भाग नाही," असं ते म्हणताना दिसतात. देवाकडे वारंवार काही मागण्यापेक्षा आपल्याला मिळालेलं आयुष्य माणूस म्हणून जगणं अधिक महत्त्वाचं असल्याचं त्यांनी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं.
"माणसाचा जन्म दिलाय, खूप झालं की. वारंवार देवळात जाऊन त्या देवाला कुठं त्रास द्यायचा?" असंही त्यांनी म्हंटलं आहे. देवाकडे पैसे किंवा इतर गोष्टी मागण्यापेक्षा मिळालेला मनुष्यजन्म सार्थकी लावण्यावर आपला विश्वास असल्याचं त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होतं.
नाना पुढे म्हणाले होते की, "माणूस म्हणून जो जन्माला घातलाय, तो माणूस हा जन्म पूर्ण सार्थकी लावेन". आयुष्य संपणार आहे, मृत्यू अटळ आहे, त्यामुळे संपत्ती कितीही असली तरी शेवटी त्याचा काय उपयोग, असा विचार त्यांनी मांडला.
राजकारणातील काही मंडळींवरही त्यांनी आपल्या खास शैलीत भाष्य केलं होतं. "कोण अमरपट्टा घेऊन आलंय?" असा सवाल करत त्यांनी माणसाने मृत्यूचं भान ठेवावं, असं सांगितलं होतं. माणूस कितीही पैसा आणि संपत्ती जमा करत असला तरी शेवटी सर्व काही इथेच राहणार आहे, हा जीवनाचा साधा नियम त्यांनी अधोरेखित केला.
याच विचारातून त्यांनी इतरांसाठी जगण्याचाही संदेश दिला. "ओंजळीभर आपल्याला पुरतं सांडण्याअगोदर देऊन टाका, नाहीतर मातीत जाणार ते," असं नाना पाटेकर म्हणाले होते.