
'कैसी ये यारियाँ' या मालिकेतून अभिनेत्री निती टेलर घराघरात पोहोचली. या मालिकेत अभिनेता पार्थ समथानसोबतच्या तिच्या जोडीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर 2020 मध्ये नितीने लहानपणापासूनचा मित्र परिक्षित बावाशी लग्न केलं. आता निती आणि परिक्षित यांच्या वैवाहिक आयुष्यात काही समस्या असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

नितीने अचानक पती परिक्षितला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. तर परिक्षितने काही काळापुरता त्याचा इन्स्टा अकाऊंट डिलीट केला होता. इतकंच नव्हे तर तिने तिच्या इन्स्टाग्राम युजरनेमवरून पतीचं 'बावा' हे आडनावसुद्धा काढून टाकलं आहे.

परिक्षितने काही दिवसांपूर्वी त्याचं इन्स्टाग्राम अकाऊंट डिअॅक्टिव्हेट केलं होतं. आता त्याने पुन्हा अॅक्टिव्हेट केलं आहे. यासोबतच नितीने तिच्या अकाऊंटवरून परिक्षितसोबतचे बरेच फोटो आणि व्हिडीओसुद्धा काढून टाकल्याचं पहायला मिळत आहे.

नितीने परिक्षितसोबत लग्नाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले होते. मात्र तेसुद्धा तिने अकाऊंटवर हटवले आहेत. म्हणूनच या दोघांमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. नितीच्या वैवाहिक आयुष्यात काहीतरी समस्या नक्कीच आहे, असा अंदाज चाहते वर्तवत आहेत.

'या दोघांमध्ये नेमकं काय झालं असेल, तिने अचानक फोटो का डिलिट केले', असा प्रश्न एका युजरने विचारला. तर 'निती तिच्या पतीसोबतचे फोटो, व्हिडीओ सतत पोस्ट करत होती. पण आता नक्कीच काहीतरी बिनसलंय', असं दुसऱ्याने म्हटलंय.

नितीने 'कैसी ये यारियाँ', 'गुलाल', 'प्यार का बंधन', 'ये है आशिकी' यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ती काही चित्रपटांमध्येही झळकली. परिक्षितसोबतच्या नात्याबद्दल अद्याप नितीने कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.