

बारामती लोकसभेसाठी अजित पवारांनी, गावागावात प्रचारसभा सुरु केल्या आहेत. पुन्हा एकदा अजित पवारांनी काका शरद पवारांवर निशाणा साधला. न्यू यॉर्कच्या पत्रकारांसमोरही शरद पवार कुटुंबाला घेवून बसायचे आणि अमेरिकेत दाखवायचे आम्ही एकत्र कसे आहोत, असं अजित पवार म्हणाले आहेत.

अजित पवारांनी युगेंद्र पवारांच्या विधानाचाही समाचार घेतला. बारामतीत शरद पवारांनीच संस्था आणल्याचं युगेंद्र पवार म्हणाले होते. शरद पवारांनीच सर्व केलं मग 35 वर्षे काय केलं ? असा प्रतिसवाल दादांनी स्टाईलमध्ये केला.

अजित पवारांनी आपला मोर्चा रोहित पवारांकडेही वळवला. शरद पवारांचा विरोध असताना, जिल्हा परिषदेच्यावेळी मीच रोहित पवारांना ए बी फॉर्म दिल्याचा किस्साही दादांनी सांगितला.

अजित पवारांनी कन्हेरी गावातही सभा घेतली. इथं अजित पवार गटाचे नेते मंगलदास बांदल यांनी शरद पवारांवर दादांच्या समोरच टीका केली. त्यावरुन रोहित पवार चांगलेच भडकले. आता अजित पवार वाघ नाही तर मांजर झाल्याची टीका रोहित पवारांनी केली आहे.