
बॅट हातात असते, तेव्हा गोलंदाजांचं काही खरं नसतं आणि चेंडू हातात असतो, तेव्हा ती फलंदाजांचा कर्दनकाळ ठरते. महिला वर्ल्डकप स्पर्धेत पूजा वस्त्राकर सध्या असंच दमदार प्रदर्शन करत आहे. हॅमिल्टनमध्ये न्यूझीलंडच्या मजबूत फलंदाजांच्या फळीचं पूजा समोर काही चाललं नाही. पूजाने कमालीची गोलंदाजी केली. तिने दहा षटकात 34 धावा देऊन चार विकेट घेतल्या.

पूजाने गोलंदाजी बरोबर जबरदस्त क्षेत्ररक्षणही केलं. पूजाने अचूक थ्रो करुन सूजी बेट्सला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. कव्हर्समध्ये पूजा उभी असताना सूजीने चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न तिच्या चांगलाच अंगाशी आला. सूजी अवघ्या पाच रन्सवर आऊट झाली. पूजाने या सामन्यात चार विकेट घेतल्या.

न्यूझीलंडचा संघ मोठी धावसंख्या उभारणार असं दिसतं होतं. पण पूजाने 47 व्या षटकात कमालीची गोलंदाजी केली. पूजाने त्या षटकात अवघ्या दोन रन्स देऊन दोन विकेट घेतल्या. पूजाच्या जबरदस्त यॉर्कर चेंडूंच न्यूझीलंडच्या फलंदाजांकडे कुठलही उत्तर नव्हतं.

पूजाने डेथ ओव्हर्समध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. तिने शेवटच्या सहा षटकांमध्ये तीन विकेट घेतल्या. पहिल्या चार षटकात पूजाने अवघ्या 15 धावा देऊन एक विकेट घेतली.

मागच्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातही पूजा वस्त्राकारने महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं. तिने अष्टपैलू खेळ दाखवला होता. आजही तिने तशीच कामगिरी केली.