
संपूर्ण देशात १९ सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होणार आहे. दहा दिवसांचा हा उत्सव २८ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. या उत्सवासाठी सार्वजनिक गणेश मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. आरास तयार करण्याचे काम पूर्णात्वाकडे आले आहे.

पुणे शहरातील आकर्षण असलेल्या दगडूशेठ गणेशोत्सव मंडळाने यंदा अयोध्या राम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. २०२४ मधील जानेवारी महिन्यात अयोध्याचे राम मंदिर भाविकांसाठी खुले होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मंडळाने मंदिराची प्रतिकृती साकारली आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळाचे हे १३१ वे वर्ष आहे. अयोध्येतील राम जन्मभूमीचे मंदिर पुढील वर्षी साकारले जाणार असल्यामुळे त्याची प्रतिकृती तयार करण्याचा निर्णय मंडळाने घेतला. गेल्या तीन महिन्यांपासून ही प्रतिकृती तयार करण्याचे काम सुरु होते.

श्री राम मंदिराच्या प्रतिकृतीचे सभा मंडप फायबर ग्लासमध्ये तयार करण्यात आले. या मंडपात २८ खांब आहेत. ४० बाय ४० जागेत मंदिराची प्रतिकृती तयार केली जात आहे. त्याची उंची २५ फुट आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑगस्ट महिन्यात पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी दगडूशेठ हलवाई मंदिरात जाऊन गणरायाचे दर्शन घेतले होते. आता १९ तारखेला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.