
आज ‘अंगारकी चतुर्थी’च्या निमित्ताने प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गणपती बप्पाला मधूर आंब्याची आरास करण्यात आली आहे. सिद्धिविनायक मंदिरात प्रत्येक चतुर्थी विशेष सजावट करण्यात येते.

आंब्याच्या सजावटीमध्ये विघ्नहर्ता श्री गणेशाची मूर्ती शोभून दिसत आहे. आज अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने मंदिरात अनेक भाविक येतील. त्यामुळे मंदिरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

प्रत्येक महिन्यात दोनवेळा चतुर्थी योग असतात. दोन्ही चतुर्थी भगवान गणेशाला समर्पित आहेत. शुक्ल पक्षावर पडणार्या चतुर्थीला ‘विनायक चतुर्थी’ आणि कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला ‘संकष्टी चतुर्थी’ म्हणतात. जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते, तेव्हा तिला ‘अंगारकी चतुर्थी’ म्हणून ओळखले जाते.

विघ्नहर्ता श्री गणेशा आपल्या भक्ताचे सर्व संकट नेहमी दूर करतो. गणेश पूजा, विशेषत: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केल्याने त्यांचा आशीर्वाद लवकर मिळतो अशी मान्यता आहे. अंगारकी चतुर्थीला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे.

अंगारकी चतुर्थी 19 एप्रिल रोजी दुपारी 04:38 पासून सुरू होईल आणि 20 एप्रिल रोजी दुपारी 01:52 पर्यंत चालेल. चतुर्थीच्या उपवासात चंद्राला अर्घ्य देणे आवश्यक असल्याने चतुर्थी ज्या दिवशी रात्री येते त्याच दिवशी मानले जाते. यावेळी संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ रात्री 09:50 आहे.