
पाकिस्ताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका 2-1 ने आपल्या खिशात घातली आहे. मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वात पाकिस्तानने जबरदस्त कामगिरी केली आहे. पण ही मालिका गमवून ऑस्ट्रेलियाने नकोसे अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या वनडे क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच एकही फलंदाज 50 किंवा त्याहून अधिक धावा करू शकला नाही. पाकिस्तान विरूद्धच्या मालिकेत एकाही फलंदाजाला अर्धशतकी खेळी करता आली नाही. ऑस्ट्रेलियाकडून जोश इंग्लिसने सर्वाधिक 49 धावा केल्या.

तिसऱ्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियन संघ फक्त 140 धावांवर बाद झाला. पाकिस्तानविरुद्ध पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन संघ इतक्या कमी धावांवर सर्व बाद झाला आहे. यापूर्वी दुसऱ्या वनडे सामन्यात 163 धावांवर डाव आटोपला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाकिस्तानची ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या या मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची फलंदाजीची सरासरी 18.77 इतकी होती. वनडे क्रिकेट इतिहासाता पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतील ऑस्ट्रेलियाची ही सर्वात कमी सरासरी आहे. यापूर्वी 2002 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाने 22.12 च्या सरासरीने धावा केल्या होत्या.

पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी एकूण 26 विकेट घेतल्या. तीन किंवा त्यापेक्षा कमी सामन्यांच्या वनडे मालिकेतील वेगवान गोलंदाजांनी अशी कामगिरी करण्याची ही दुसरी वेळ आहे. 2007 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजांनी 27 बळी घेतले होते. (सर्व फोटो- ट्वीटर)