
चषक जिंकण्याच्या आशेने आयपीएल सीझन 16 ची सुरुवात करणारा आरसीबी संघ साखळी फेरीतून बाहेर पडला आहे. आरसीबीने 14 पैकी 7 सामन्यात विजय आणि 7 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं. दोन गुणांच्या फरकामुळे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं.

गुजरात टायटन्सने शेवटच्या साखळी फेरीतील सामन्यात पराभूत केलं. यामुळे आरसीबीचं आव्हान संपुष्टात आलं. तसेच आरसीबी चाहत्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली.

पराभवानंतर निराश झालेल्या आरसीबी चाहत्यांसाठी विराट कोहलीने भावनिक संदेश दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांचे आभार मानले आहेत.

"सर्वोत्तम क्षणांचा साक्षीदार असलेला आयपीएल हंगाम.. दुर्दैवाने, आम्ही लक्ष्य गाठू शकलो नाही. हे निराशाजनक आहे. परंतु आम्ही आमची मान कायम उंचावली पाहिजे ती आमच्या निष्ठावंत समर्थकांसाठी, आम्हाला प्रत्येक टप्प्यावर साथ दिल्याबद्दल धन्यवाद," अशी पोस्ट विराट कोहलीने लिहिली आहे.

विराट कोहलीच्या नावावर आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम नोंदवला गेला आहे. या पर्वात त्याने सलग दोन शतकं ठोकली.

14 सामन्यात शानदार फलंदाजी करणाऱ्या विराट कोहलीने 2 शतकांसह एकूण 639 धावा केल्या. संघाच्या विजयातही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, आरसीबीचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकला नाही.