
आयपीएल स्पर्धेतील 18 व्या मोसमातील (IPL 2025) सातवा सामना सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळवण्यात आला. उभयसंघातील सामना हा हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. लखनौचा फलंदाज निकोलस पूरनने स्फोटक खेळी केली. पूरनने हैदराबादविरुद्ध अर्धशतकी खेळीसह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अनेक फलंदाजांना मागे टाकलं.

पूरनने हैदराबादविरुद्ध 26 चेंडूत 6 चौकार आणि 6 षटकारांसह 70 धावा केल्या. पूरनची ही या मोसमातील एकूण आणि सलग दुसरी अर्धशतकी खेळी ठरली. पूरनने याआधी दिल्ली कॅपिट्ल्सविरुद्ध 75 धावा केल्या. ताज्या आकड्यांनुसार, निकोलस पूरन याच्याकडे ऑरेंज कॅप आहे.

निकोलस पूरन याने आतापर्यंत 2 सामन्यांमध्ये 72.50 च्या सरासरीने आणि 258.92 च्या स्ट्राईक रेटने 145 धावा केल्या आहेत. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पूरनने मिचेल मार्श, ट्रेव्हिस हेड आणि ईशान किशन यांना पछाडलं आहे.

मिचेल मार्श ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानी आहे. मार्शने हैदराबादविरुद्ध 51 धावा केल्या. मार्शने आतापर्यंत 2 सामन्यांमध्ये 62 च्या सरासरीसह 185.07 च्या स्ट्राईक रेटने 124 धावा केल्या आहेत.

ट्रेव्हिस हेड या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. हेडने 2 सामन्यांमध्ये 57 च्या सरासरीने आणि 193.22 च्या स्ट्राईक रेटने 114 धावा केल्या आहेत. हेडने लखनौविरुद्ध 167.86 च्या स्ट्राईक रेटने 28 बॉलमध्ये 47 रन्स केल्या.

दरम्यान हैदराबाद विरुद्ध लखनौ सामन्याआधी ईशान किशनकडे ऑरेंज कॅप होती. ईशान किशनने पहिल्याच सामन्यात शतकी खेळी केली.ईशानने सलामीच्या सामन्यात 106 धावा केल्या. मात्र ईशानला लखनौविरुद्ध भोपळाही फोडता आला नाही.