
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने आपल्या नेहमीच्या अंदाजात इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसरं शतक ठोकलंय. रोहितने शुबमन गिल याच्यासोबत दुसऱ्या विकेटसाठी 171 धावांची भागीदारी केली.

रोहितने धर्मशालेत टीम इंडियाच्या पहिल्या डावात 162 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 13 फोरच्या मदतीने 103 धावा केल्या. रोहितने या शतकासह अनेक विक्रम केले आहेत.

रोहित शर्मा याचं इंग्लंड विरुद्ध शतक हे त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 48 वं शतक ठरलं. रोहितने यासह टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि विद्यमान प्रशिक्षक यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

रोहित शर्माने या 48 व्या आंतरराष्ट्रीय शतकासह यूनिव्हर्स बॉस ख्रिस गेला याला मागे टाकलं. रोहितने ओपनर म्हणून ख्रिस गेल याच्या 42 शतकांचा रेकॉर्ड ब्रेक केला. रोहितने 48 पैकी 43 शतकं ही ओपनर म्हणून ठोकली आहेत.

तसेच रोहित शर्मा टीम इंडियासाठी 2021 पासून सर्वाधिक शतकं करणारा फलंदाज आहे. रोहितने आतापर्यंत 2021 पासून कसोटी क्रिकेटमध्ये 6 शतकं ठोकली आहेत.