Terence Lewis: आमच्यात शारीरिक संबंध..; कोरिओग्राफर टेरेन्सने गुपचूप केलं लग्न? पार्टनरसोबत मुलंही
Terence Lewis: प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि डान्सर टेरेन्स लुईस याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी मोठा खुलासा केला आहे. 27 वर्षांपासून एका व्यक्तीसोबत असल्याचं त्याने म्हटलंय.

Terence Lewis Marriage: बॉलिवूड आणि मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध कोरिओग्राफर टेरेंस लुईस त्याच्या डान्समुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या डान्स स्टाइलचे लाखो चाहते आहेत. मात्र, आता टेरेंस त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने त्याच्या आयुष्यातील दोन लाइफ पार्टनरबद्दल मोठा खुलासा केला आहे. विशेष म्हणजे, त्यांच्यापैकी एका व्यक्तीसोबत तो गेल्या 27 वर्षांपासून जोडलेला आहे.
'न्यूज 18'ला दिलेल्या मुलाखतीत टेरेंसला त्याच्या लग्नाबद्दल आणि आयुष्याच्या जोडीदाराबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना तो म्हणाला, माझ्या आयुष्यात आधीपासूनच लाइफ पार्टनर आहेत. माझा पहिला लाइफ पार्टनर म्हणजे माझा डान्स. तर दुसरा लाइफ पार्टनर ही माझ्या कामाशी संबंधित एक व्यक्ती आहे. ती गेल्या 27 वर्षांपासून माझ्यासोबत आहे.
या नात्याबद्दल अधिक बोलताना टेरेंस म्हणाला की, आमच्यात शारीरिक संबंध नाहीत, मात्र आम्ही भावनिकदृष्ट्या एकमेकांशी खूप जोडलेले आहोत. ती व्यक्तीदेखील माझ्यासोबत डान्स क्षेत्रात काम करते. त्यामुळे आमचं नातं हे प्रामुख्याने कामाशी संबंधित आहे. टेरेंसने त्या व्यक्तीची ओळख मात्र सार्वजनिक केलेली नाही.
टेरेंसने त्याच्या आयुष्यातील पालकत्वाच्या अनुभवाबद्दलही सांगितलं. तो म्हणाले की, जेव्हा आम्ही मिळून आमचं डान्स इन्स्टिट्यूट सुरू केलं, तेव्हा तिथल्या सर्व डान्सर्सचे आम्ही आई-वडील झालो. आमची स्वतःची मुलं नसली तरी आमची अनेक मुलं आहेत. त्यांना आम्ही जन्म दिलेला नाही, पण त्यांना प्रेमाने वाढवलं आहे.
टेरेंसच्या मते, त्याने त्याच्या आठ भावंडांच्या मुलांचीही स्वतःच्या मुलांप्रमाणे काळजी घेतली आहे. अनेकदा पालकाची भूमिका निभावत त्याने या मुलांना मोठं केलं आहे. त्यामुळे त्याला पालकत्वाचा आनंद अनुभवता आला आहे. आपल्या आयुष्याबद्दल बोलताना टेरेंसने सांगितलं की, अनेक अर्थांनी त्याने त्याचं वैवाहिक आयुष्य जगलं आहे. फक्त त्याच्याकडे लग्नाचे कागदपत्र किंवा कोणतंही कायदेशीर नातं जोडणारा शिक्का नाही.
टेरेंस लुईस हा प्रसिद्ध डान्सर, कोरिओग्राफर आणि डान्स प्रशिक्षक आहेत. 'डान्स इंडिया डान्स' आणि 'इंडियाज बेस्ट डान्सर' यांसारख्या लोकप्रिय रिअॅलिटी शोमधून तो घराघरात पोहोचला. त्याच्या डान्समधील कौशल्यासोबतच स्पष्टवक्तेपणासाठीही तो ओळखला जातो.