
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. प्रेक्षकांच्या याच प्रेमापोटी मालिका गेल्या अनेक आठवड्यांपासून नंबर वन वर आहे. लवकरच प्रेक्षकांना अर्जुन-सायलीसोबत माथेरान फिरण्याची संधी मिळणार आहे.

लग्नानंतर अर्जुन-सायलीने हनीमूनला जावं अशी अर्जुनच्या आईची इच्छा होती. आईच्या सांगण्यावरुनच हो नाही म्हणता म्हणता माथेरानच्या प्लॅनवर शिक्कामोर्तब झालं आहे.

सुरुवातीला सायलीचा या ट्रीपला नकार होता. मात्र अर्जुनने आपल्या दोघांमध्ये मैत्रीचं नातं आहे, त्यामुळे हनीमून नाही तर या ट्रीपला फ्रेंडमून म्हणून जाऊया असं सांगून त्याने सायलीचं मन वळवलं. माथेरान सफरीमध्ये नेमक्या काय गंमती-जंमती पाहायला मिळणार हे लवकरच कळेल.

माथेरानमधल्या शूटिंगच्या अनुभवाविषयी सांगताना जुई गडकरी म्हणाली, "अतिशय सुंदर अनुभव होता. सेटच्या बाहेर जाऊन आम्ही पहिल्यांदाच शूट केलं. मी मूळची कर्जतची. त्यामुळे लहानपणी अनेकदा माथेरानला फिरायला जायचे. लहानपणीच्या सगळ्या आठवणी शूटिंगमुळे जाग्या झाल्या."

"आमचे खूप सारे चाहतेही आम्हाला इथे भेटले. काहींची तर मालिकेत काम करण्याची इच्छाही माथेरान शूटिंगमुळे पूर्ण झाली आहे. खूप आपुलकीने आणि आदराने माथेरानला आमचं स्वागत झालं. खाण्यापिण्याची चंगळ होतीच. पण मला सर्वात कौतुक वाटतं ते आमच्या तंत्रज्ञांचं. शूटिंगचा ताफा सांभाळताना त्यांची खरी कसरत होत होती," असंही ती म्हणाली.