‘तुंबाडची मंजुळा’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; 8 दिवसांत बजेट वसूल
'तुंबाडची मंजुळा' हा चित्रपट 5 जून रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. दमदार स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाने अवघ्या आठ दिवसांत बजेट वसूल केला आहे. या चित्रपटाची आतापर्यंत किती कमाई झाली, ते जाणून घ्या..

रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' आणि प्रवीण तरडेंचा 'देऊळ बंद 2' या चित्रपटांनंतर सध्या सर्वत्र चर्चा आहे ती 'तुंबाडची मंजुळा' या चित्रपटाचीच. रहस्य, भीती , गुढता आणि त्याच्या सोबतीला एकाहून एक अतरंगी गावकऱ्यांची धमाल गोष्ट यात पहायला मिळतेय. जरी चित्रपटाला भयपटाची पार्श्वभूमी असली, तरी हा चित्रपट निखळ विनोद आणि भरभरून मनोरंजनाचा अनुभव देणारा असल्याच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.

मकरंद अनासपुरे, जितेंद्र जोशी , ओम भुतकर, अंशुमन विचारे, योगेश शिरसाट, गणेश पंडीत, शार्दूल सराफ यांच्यासोबत इतर कलाकारांचा सहजसुंदर अभिनय, विनोदाचं अचूक टायमिंग, सोबतीला असलेले भन्नाट संवाद यामुळे 'तुंबाडची मंजुळा' या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सोबतच एका गुढ वलयात दिसणारी सई ताम्हणकर सर्वांचं लक्ष वेधून घेते.

या चित्रपटाचा एकूण बजेट सहा कोटी रुपये असल्याचं समजतंय. तर 5 जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 6.45 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर ग्रॉस कलेक्शनचा आकडा 7.61 कोटी रुपये आहे. या चित्रपटात जितेंद्र जोशी, ओम भुतकर, मकरंद अनासपुरे, अंशुमन विचारे, योगेश शिरसाट, गणेश पंडित, सिद्धेश्वर झाडबुके, वर्षा दांदळे, शार्दुल सराफ, रीलस्टार अथर्व रुके, नवोदित अभिनेत्री प्रियल नाईक आणि उषा नाडकर्णी हे कलाकार आहेत.

ऋषिकेश तुरई यांचं लेखन असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन विविध कोरगांवकर या नव्या दमाच्या दिग्दर्शकाने केलं आहे. रहस्य, विनोद आणि लोककथांचा अनोखा संगम असलेल्या या चित्रपटाला सर्व स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराच्या अभिनयाचं विशेष कौतुक होत आहे.

'तुंबाडची मंजुळा' हा चित्रपट त्यातील कलाकारांच्या अनोख्या लूकमुळेही चर्चेत आला आहे. यामध्ये मकरंद अनासपुरे हे एका भोंदू महाराजांच्या भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे ट्रेलर पाहिल्यानंतर त्यांच्या आईलासुद्धा साधूच्या भूमिकेत मकरंदच आहेत, हे ओळखता आलं नसल्याचं त्यांनी सांगितलं.