
पुणे जिल्ह्यात मुळशी तालुक्यातील भुकूम येथील विवाहिता वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. वैष्णवीने आत्महत्या केल्याचं सुरुवातीला बोललं जात होतं. मात्र आमच्या मुलीने आत्महत्या केलेली नाही तर तिचा खून करण्यात आलाय, असा गंभीर आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, याच वैष्णवी हगवणेची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपवरून आता वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.

वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. वैष्णवीची आत्महत्या नसून, खून झाल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला होता. या घटनेनंतर राजेंद्र हगवणे आणि त्यांचा दुसरा मुलगा सुशील हगवणे फरार झाले आहेत, तर वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

वैष्णवी आणि शशांक यांचा 28 एप्रिल 2023 रोजी सूसगाव येथे प्रेमविवाह झाला होता.घरच्यांच्या विरुद्ध जाऊन वैष्णवीने हे लग्न केलं होतं. परंतु तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यात येत होता.

एवढंच नाही लग्नात तिच्या माहेरच्यांनी हुंडा म्हणून तब्बल 51 तोळे सोनं दिलं होतं. तसेच फॉर्च्यूनर गाडीही दिली होती. यासह महागडी भांडी, लग्नानंतर चांदीची मूर्ती, दीड लाखांचा मोबाईल असं बरंच काही वैष्णवीच्या घरच्यांनी तिच्या सासरच्या मंडळींना दिलं होतं. तिचं लग्न हे फारचं थाटामाटात करण्यात आलं होतं. तरी देखील तिचा जाच केला जात होता, असा आरोप करण्यात आला आहे.

16 मे 2025 रोजी वैष्णवीने गळफास घेतल्याचे शशांकने सांगितले. चेलाराम हॉस्पिटलमध्ये ती बेशुद्ध अवस्थेत आढळली आणि डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा आणि गळ्यावर लालसर व्रण आढळले. शशांक आणि राजेंद्र यांनी "पैसे न दिल्याने वैष्णवीला मारले" असे सांगितल्याचा दावा कस्पटे यांनी केला आहे.

दरम्यान व्हायरल व्हिडीओ क्लिपमध्ये वैष्णवी समोरच्या व्यक्तीशी संवाद साधताना तिच्या नवऱ्याने तिला मारहाण केल्याचंही तिने सांगितलं तसेच. ती तिच्या नवऱ्याला घटस्फोट देणार असून माझा नवरा कधीच माझा होऊ शकला नाही अशी खंतही ती व्यक्त करताना दिसत आहे.

तसेच ती पुढे म्हणाली की, "सासू-सासरे यांच तर तसंच वागणं असतं. मी सगळ्यांना विरोध करून लग्न केलं. इथंच माझी चूक झाली. मी त्या घरात जाऊन चूक केली. सगळं बोलण्याच्या, समजण्याच्या पलीकडे गेलं आहे. ही छोटी गोष्ट आहे" असंही या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे.

त्यामुळे आता या प्रकरणाचे निघत असलेल्या वेगवेगळ्या बाजू पाहता या प्रकरणाला आणखी कोणतं नवं वळण लागणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

(टीप- दरम्यान टीव्ही 9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.)