
अभिनेता सैफ अली खानने वयाच्या 21 व्या वर्षी अभिनेत्री अमृता सिंहशी लग्न केलं होतं. अमृता सैफपेक्षा वयाने मोठी आहे. या दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. लग्नाच्या 13 वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला. या दोघांना इब्राहिम आणि सारा ही दोन मुलं आहेत.

2005 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत सैफ त्याच्या घटस्फोटाबद्दल आणि अमृताला दिलेल्या पोटगीबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला होता. यावेळी त्याने अमृतावर काही आरोपही केले होते. अमृताने सतत माझा आणि माझ्या कुटुंबीयांचा अपमान केला, असं सैफ म्हणाला होता.

घटस्फोटानंतर सैफला सारा आणि इब्राहिम या दोन्ही मुलांचा ताबा हवा होता. पण त्यासाठी अमृताशी भांडणं त्याला पटलं नाही. सैफला पोटगी म्हणून पाच कोटी रुपये द्यायचे होते. त्यापैकी अडीच कोटी रुपये त्याने आधीच अमृताला दिले होते.

त्याचप्रमाणे इब्राहिम 18 वर्षांचा होईपर्यंत सैफला दर महिन्याला एक लाख रुपये द्यावे लागले होते. "मी काही शाहरुख खान नाही. माझ्याकडे इतका पैसा नाही. पण मी तिला उरलेले सर्व पैसे देणार. मी माझ्या कामातून जो काही पैसा कमावला होता, तो सर्व अमृताला दिला. माझ्याकडे काहीच उरलं नव्हतं", असं सैफ म्हणाला.

याविषयी तो पुढे म्हणाला, "मला मरेपर्यंत काम करत राहावं लागलं तरी चालेल, पण मी अमृताचे सर्व पैसे तिला देणार. मला सतत अपराधीपणाच्या भावनेनं मारू नका."