फडणवीस-दानवेंनी माझ्यावर 58 चौकशा लावल्या, फडणवीसांनी ‘दूध का दूध’साठी तयार राहावं : सत्तार

"एकही शेतकरी आर्थिक मदतीपासून सुटणार नाही आणि जर सूटला तर तहसीलदारपासून खालच्या अधिकाऱ्यांना निलंबित करणार", असा इशारा अब्दुल सत्तार यांनी दिला (Abdul Sattar slams Devendra Fadnavis).

फडणवीस-दानवेंनी माझ्यावर 58 चौकशा लावल्या, फडणवीसांनी 'दूध का दूध'साठी तयार राहावं : सत्तार

औरंगाबाद : “जलयुक्त शिवार योजनेत कुठलीही दडपशाही होत नाही. उलट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीच दडपशाही केली होती. फडणवीस आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी माझ्यावर 58 चौकशा लावल्या होत्या. पण आम्ही घाबरलो नाही. आता फडणविसांनीही दूध का दूध, पाणी का पाणीसाठी तयार असलं पाहिजे”, असा घणाघात शिवसेना नेते आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला (Abdul Sattar slams Devendra Fadnavis).

अब्दुल सत्तार सध्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी करत शेतकऱ्यांना धीर देत आहेत. दरम्यान, त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. “देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात फिरण्यापेक्षा मोदींकडे जाऊन बसावे आणि आमचे हक्काचे जीएसटीचे पैसे द्यायला सांगावे. त्यामुळे आम्हाला तातडीने शेतकऱ्याला मदत करता येईल”, असं अब्दुल सत्तार म्हणाले.

“शरद पवार देशाचे नेते आहेत. शेतकऱ्यांवर कुठलंही संकट येतं तेव्हा ते भेटीला धावून जातात. सरकारला मदत करायला सांगतात. सरकारला दिशा देतात. त्यामुळे नरेंद्र मोदी त्यांना गुरु मानतात. मोदींचे गुरु सध्या दुष्काळात फिरत आहेत. त्यामुळे फडणवीस बाहेर निघाले” असा दावा त्यांनी केला (Abdul Sattar slams Devendra Fadnavis).

शेतकऱ्यांच्या मदतीबाबत प्रश्न विचारला असता, “एकही शेतकरी आर्थिक मदतीपासून सुटणार नाही आणि जर सुटला तर तहसीलदारपासून खालच्या अधिकाऱ्यांना निलंबित करणार”, असा इशारा अब्दुल सत्तार यांनी दिला.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस आज उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान आज सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली होती. राज्य सरकार केंद्राकडून मदत मिळावी, असं म्हणत जबाबदारी झटकत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता.

संबंधित बातम्या :

फडणवीस मुख्यमंत्र्यांना म्हणाले, थिल्लरपणा शोभत नाही, आता जयंत पाटलांचं उत्तर

Published On - 12:45 pm, Tue, 20 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI