Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात जनतेला संबोधित करणार

कोरोना, अनलॉक, चीनसोबतचे संबंध अशा कोणत्या विषयावर मोदी भाष्य करणार, याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.

Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात जनतेला संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी (मंगळवार 20 ऑक्टोबर) देशाला संबोधित करणार आहेत. नेहमीप्रमाणे रात्री आठ वाजताच्या वेळेला छेद देत मोदींनी नवीन वेळ निश्चित केली आहे. पंतप्रधान संध्याकाळी 6 वाजता देशाला संबोधित करतील. कोरोना, अनलॉक, चीनसोबतचे संबंध अशा कोणत्या विषयावर मोदी भाष्य करणार, याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. (PM Narendra Modi to share message with Nation)

कोरोनाच्या काळात सातव्यांदा पंतप्रधान मोदी देशवासियांशी संवाद साधणार आहेत. याआधी जनता कर्फ्यू, लॉकडाऊनची घोषणा, लॉकडाऊनमधील वाढ अशा मुद्द्यांवर भाष्य केले आहे. लाल किल्ल्यावर 74 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताचा नारा दिला होता. देशात कोरोनाच्या तीन लसी विविध टप्प्यात असून वैज्ञानिकांनी हिरवा कंदील दाखवताच वेगाने प्रत्येक भारतीयापर्यंत लस पोहोचवण्याची रूपरेखा तयार असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली होती.

दसरा-दिवाळीसारखे मोठे सण काही दिवसांवर आले आहेत. त्यामुळे सरकारकडून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मोदी काही बोलतील का याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. कोरोना संसर्गाच्या स्थितीबाबत, लस संशोधनाबाबत मोदी काही माहिती देणार का, याची देशात उत्सुकता आहे.

आठचा मुहूर्त चुकवला

नोटाबंदीच्या विषयापासून जनता कर्फ्यू, लॉकडाऊन अशा अनेक महत्त्वाच्या घोषणांसाठी पंतप्रधानांनी रात्री आठ वाजताचा मुहूर्त निवडला होता. यावेळी मात्र त्यांनी संध्याकाळी सहा वाजताची वेळ निश्चित केली आहे.

कोरोनाच्या काळात पंतप्रधानांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशीही चार ते पाच वेळा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता. नुकताच महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्वतः फोन करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बातचित केली होती. त्यामुळे नुकसानग्रस्तांना मदतीबाबत नरेंद्र मोदी काही घोषणा करणार का, याकडेही महाराष्ट्रातील जनतेचे डोळे आहेत.

भारताकडे ज्याने वाकडी नजर करुन पाहिले, त्यांना सडेतोड उत्तर देण्यात आलं आहे, असंही नरेंद्र मोदी म्हणाले होते, त्यामुळे चीनसोबतच्या तणावावर मोदी भाष्य करतील का, असाही तर्क लढवला जात आहे.

(PM Narendra Modi to share message with Nation)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *