‘शिवसेना मला बघून घेणार म्हणजे, माझा मर्डर करणार आहे का?’

| Updated on: Oct 13, 2020 | 10:35 AM

मर्डर करणार असाल तर कुठे यायचं ते सांगा, मी तिकडे येतो, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.

शिवसेना मला बघून घेणार म्हणजे, माझा मर्डर करणार आहे का?
Follow us on

मुंबई: छत्रपती घराण्याविरोधात बोलल्यास तुम्हाला बघून घेऊ, असे शिवसेनेच्या मुखपत्रातून सांगितले जाते. मला बघून घेणार, म्हणजे नक्की काय करणार? ते माझा खून करणार आहेत का, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसवा प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.

ते सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ‘सामना’तून करण्यात आलेल्या टीकेवरुन सेनेवर पलटवार केला. मुळात ‘सामना’ या सगळ्या प्रकरणात का भूमिका घेत आहे, तेच मला समजत नाही. मला सामनाला एवढंच विचारायचं आहे की, तुम्ही बघून घेणार म्हणजे नेमकं काय करणार? मारणार, मर्डर करणार?, त्याचा खुलासा करुन टाका. तसे असेल तर कुठे यायचं ते सांगा, मी येतो, असे जाहीर आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेला दिले.

तसेच प्रकाश आंबेडकर यांनी बिहार विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट होण्याचे भाकीतही वर्तवले. सध्या केंद्र आणि राज्य सरकारमध्ये शह-काटशहाचे राजकारण सुरु आहे. केंद्र व राज्यात अराजकीय मुद्द्यांवरुन राजकारण सुरु असले तर त्यावरुन फारसा परिणाम होत नाही. सध्याच्या परिस्थितीत केंद्र सरकार आपातकालीन व्यवस्थापन कायद्यातंर्गत आदेश काढत आहे.

केंद्र सरकारने नुकत्या मंजूर केलेले कृषी विधेयक राज्यात लागू करण्यास महाविकासआघाडी सरकारने विरोध दर्शविला आहे. ही एकप्रकारची बंडखोरी आहे. भारतीय घटनेने राज्याला अशाप्रकारे बंडखोरी करण्याचा अधिकार दिलेला नाही. केंद्र सरकारने एखादा कायदा मंजूर केल्यास राज्यांना त्याचे पालन करणे बंधनकारक असते. त्यामुळे राज्य सरकारने कृषी विधेयक लागू करण्यास नकार दिल्यास कलम 356 अंतर्गत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?

प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणासंदर्भात उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे यांनी घेतलेल्या भूमिकेवर त्यांनी टीकास्त्र सोडले होते. ‘एक राजा तर बिनडोक आहे. असं मी म्हणेन, दुसरे संभाजीराजे आहेत, त्यांनी भूमिका घेतली हे बरोबर आहे. पण ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर भर देत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते. यानंतर छत्रपती घराण्याचे समर्थक आणि मराठा संघटनांचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात आक्रमक झाले होते.


संबंधित बातम्या:

आम्ही फक्त तीनच राजेंना मानतो, पहिले सम्राट अशोक : प्रकाश आंबेडकर

राजेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, प्रकाश आंबेडकर आणि गुणरत्न सदावर्तेंविरोधात साताऱ्यात गुन्हा

भिडे कुठे आहेत? माझ्या विधानानंतर बंद पुकारणारे संभाजी भिडे आता गप्प का? : संजय राऊत