पंकजांसोबतच्या भेटीचे फोटो व्हायरल, राष्ट्रवादीचे बजरंग सोनावणे म्हणतात…

| Updated on: Aug 02, 2019 | 7:12 PM

बीडचे लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनावणे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे मेसेज सध्या व्हायरल होत आहेत. मात्र त्यामध्ये काहीही तथ्य नसल्याचं बजरंग सोनावणे यांनी सांगितलं.

पंकजांसोबतच्या भेटीचे फोटो व्हायरल, राष्ट्रवादीचे बजरंग सोनावणे म्हणतात...
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

मुंबई/ बीड : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारत आहेत. एकीकडे पक्षबदल होत असताना, दुसरीकडे नेत्यांच्या पक्षबदलाच्या अनेक अफवाही पसरत आहे. बीडचे लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनावणे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे मेसेज सध्या व्हायरल होत आहेत. मात्र त्यामध्ये काहीही तथ्य नसल्याचं बजरंग सोनावणे यांनी सांगितलं.

बजरंग सोनावणे आणि राष्ट्रवादीचे बीडचे जिल्हा परिषद सदस्य अजय मुंडे यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा होती. मात्र ही चर्चा बजरंग सोनावणे यांनी फेटाळली.

हे दोघेही भाजप नेते आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या बंगल्यावर असल्याचे फोटो व्हायरल झाले होते. बीडमधील अपात्र नगरसेवकांवरील सुनावणी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या बंगल्यावर ठेवली होती. या प्रकरणात बजरंग सोनावणे हे याचिकाकर्ते आहेत, ते तिथे सुनावणीसाठी गेले होते. मात्र आपण सुनावणीसाठी गेल्यानंतर तिथे फोटो काढून ते व्हायरल करण्यात आल्याचा दावा सोनावणे यांनी केला.

मुंडेंविरुद्ध निवडणूक लढलेला उमेदवार निवडणुकीनंतर भाजपात

बीड लोकसभेचा इतिहासही रंजक आहे. यात सर्वात रंजक गोष्ट म्हणजे जो उमेदवार लोकसभेला मुंडेंविरोधात लढला, तो पुढच्या काही दिवसातच भाजपात आलाय. गेल्या दोन टर्मपासूनचा हा ट्रेंड पाहायला मिळतो.

2009 च्या लोकसभेला भाजपकडून गोपीनाथ मुंडे उमेदवार होते, तर राष्ट्रवादीकडून रमेश आडसकर यांना उमेदवारी होती. आडसकर हे देखील गोपीनाथ मुंडे यांच्याच तालमीत तयार झालेले नेते. पण राष्ट्रवादीत त्यांनी प्रवेश केला आणि गोपीनाथ मुंडेंविरुद्ध दंड थोपटले. या निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांचा विजय झाला. निवडणुकीनंतर रमेश आडसकर पुन्हा एकदा भाजपात परतले.

2014 ला मोदी लाट होती. या निवडणुकीतही पुन्हा एकदा 2009 ची पुनरावृत्ती घडली. राष्ट्रवादीकडून माजी मंत्री सुरेश धस यांना संधी देण्यात आली. बीडची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी नेहमीच प्रतिष्ठेची असते. त्यामुळे सुरेश धस यांच्या प्रचारासाठी शरद पवार आणि अजित पवार बीडमध्ये तळ ठोकून होते. पण गोपीनाथ मुंडे यांनी मोठ्या फरकाने सुरेश धस यांचा पराभव केला. 3 जून 2014 ला गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं. त्यांच्यानंतर त्यांची कन्या प्रितम मुंडे खासदार झाल्या. काही महिन्यात झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांवेळी सुरेश धस यांनी जाहीरपणे भाजपला मदत केली आणि यानंतर ते भाजपचे आमदार बनले.

कोण आहेत बजरंग सोनवणे?

बजरंग सोनवणे हे नाव लोकसभा निवडणुकीत राज्यभर चर्चेत आलं. धनंजय मुंडे यांनी बजरंग सोनवणे यांना राष्ट्रवादीकडून प्रितम मुंडेंविरुद्ध मैदानात उतरवलं होतं. त्यावेळी प्रितम मुंडे यांनी बजरंग सोनवणे यांचा पराभव केला.

बजरंग सोनवणे हे बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत. ते स्वतः चिंचोली माळी जिल्हा परिषद गटातून, तर यांच्या पत्नी सारीका सोनवणे या युसुफवडगाव गटातून जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत. या पूर्वी बजरंग सोनवणे यांनी बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण आणि आरोग्य सभापतीपद भूषविले असून त्या काळात त्यांनी शिक्षण आणि शाळांना आयएसओ मानांकन मिळवून देणे आणि गुणवत्ता वाढीसाठी केलेले प्रयत्न याची राज्यस्तरावर चर्चा झाली होती.

बजरंग सोनवणे यांचे सहकार क्षेत्रातही चांगले कार्य असून खरेदी विक्री संघही त्यांच्या ताब्यात आहेत. तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ते चालवित असलेला येडेश्वरी साखर कारखान्याचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. बजरंग सोनवणे हे विरोधी पक्षनेते धंनजय मुंडे यांचे ते अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात.

संबंधित बातम्या 

बीडमध्ये राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा मुंडेंच्याच तालमीत तयार झालेला उमेदवार