
मुंबई | 26 जानेवारी 2024 : इंडिया आघाडीची लगीनगाठ पक्की होण्यााआधीच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार भाजपसोबत तिसऱ्यांदा सत्तेची फेरी घेण्याच्या तयारीत आहेत. बिहारमध्ये भेटीगाठीही सुरु झाल्यायत. पुढच्या काही तासातच लालूंची साथ सोडून नितीश कुमार भाजपसोबत सत्तेत नव्यानं विराजमान होण्याची दाट शक्यता आहे. जेडीयू आणि भाजप नेत्यांचेही सूर बदलले आहेत. एक काळ असा होता की बिहारच्या राजकारणात नितीश कुमारांना सुशासन बाबू म्हटलं जायचं. मात्र नंतर तीच उपाधी बदलून पलटूराम असंही बिरुद त्यांना लागलं. नितीश कुमार 2005 ते 2014 पर्यंत ते एनडीएत होते. विरोधात होती यूपीए आघाडी. 2014 ला नितीश कुमार एनडीएला सोडून यूपीएत गेले. 2015 मध्ये लालूंच्या पक्षासोबत बिहारची सत्ता मिळवली, विरोधात होती भाजप. 2017 सालात लालूंची साथ सोडून ते भाजपसोबत गेले, लालू विरोधात बसले. 2020 मध्ये नितीश कुमारांनी भाजपसोबत निवडणूक लढवली. 2022 ला पुन्हा नितीश कुमारांनी भाजपची साथ सोडून लालूंचा हात धरला. आणि आता 2024 ला पुन्हा लालूंना रामराम करत ते भाजपशी हातमिळवण्याच्या तयारीत आहेत.
1985 साली नितीश कुमार लालूंच्या जनता दल पक्षातून पहिल्यांदा आमदार झाले. तेव्हा ते स्वतःला लालू प्रसाद यादवांचा छोटा भाऊ मानायचे. मात्र नंतर त्यांनी जनता दलला सोडचिठ्ठी दिली आणि स्वतःची समता पार्टी बनवली. 1998 मध्ये केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपशी दोस्ती केली. वाजयेपी सरकारमध्ये मंत्री बनले. नंतर समता पार्टी जेडीयूत विलीन केली. नंतरची जवळपास 17 वर्ष नितीशकुमारांनी एनडीएसोबत संसार केला. 2005 ते 2013 अशी ७ वर्ष बिहारची सत्तासमीकरणंही ठिकठाक होती. पण 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी भाजपचा चेहरा बनले. त्यावरुनच नाराज झालेल्या नितीश कुमारांनी एनडीएची साथ सोडत लालूंसोबत दोस्ती केली.
2015 ला बिहार विधानसभेत नितीश-लालू जोडीनं भाजपचा दारुण पराभव केला. नितीश मुख्यमंत्री बनले आणि लालूंचे पुत्र उपमुख्यमंत्री पण नितीश-लालूंच्या सत्तासंसाराची दोनच वर्षात भांडी वाजू लागली. नोदाबंदी-जीएसटीसारख्या मुद्द्यांवरुन नितीश कुमारांनी मोदींचं कौतूक केलं. नंतर तेजस्वी यादवांसहीत लालू यादवांच्या घरी सीबीआयच्या धाडी पडल्या. यावरुन लालूंसोबत फारकत घेत नितीश कुमार पुन्हा एनडीएच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्री बनले.
2020 ला बिहारमध्ये भाजपसोबतच नितीश कुमारांनी निवडणूक लढवली. सत्ता आली, नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले. मात्र त्यांचा जेडीयू पक्ष निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर राहिला. 2 वर्ष संसार चालत-चालत 2022 साल आलं. इकडे महाराष्ट्रात शिंदेंनी बंड करत शिवसेनेवर मालकीचा दावा केला. या घडामोडीत शिंदेंना भाजपनं साथ दिली. मात्र महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्येही भाजप आमचा पक्ष फोडतोय अशी शंका नितीश कुमार समर्थक वर्तवू लागले. या शंकेत पाटण्यात भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डांनी केलेल्या विधानानं भर घातली. यावरुनच नितीश कुमारांनी पुन्हा भाजपची साथ सोडली आणि लालूंचा पाठिंबा घेऊन 3 वर्षात तिसरा साथीदार बदलून मुख्यमंत्री झाले.
2023 मध्ये भाजप हिंदुत्वाच्या नावानं धार्मिक ध्रुवीकरण करत असल्याचा आरोप नितीश कुमार करत होते. त्यातच जातगणनेचे आकडे जाहीर करुन नितीश कुमारांनी धार्मिक ध्रुवकरणाला एकप्रकारे उत्तर दिलं. 2024 च्या तयारीसाठी भाजपविरोधात इंडिया आघाडी बनली. पहिली बैठक बिहारच्याच पाटण्यात झाली. पण ४ दिवसांपूर्वी भाजपनं कर्पूरी ठाकुरांना भारतरत्न देण्याची घोषणा करताच नितीश कुमारांनी मोदींचं कौतूक केलं आणि आता त्यांची नितीश कुमारांची एनडीएत तिसऱ्यांदा घरवापसीची शक्यता आहे.
2019 पासून महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं, तर ते सुद्धा थोड्या-बहुत फरकानं बिहार इतकचं किंवा त्याहून काकणभर जास्तीचं रंजक बनलंय. 2020 मध्ये बिहारमध्ये जेडीयू-भाजपची सत्ता आली. 2022 ला त्यांनी भाजपची साथ सोडून लालूंना जवळ केलं. आणि 2024 ला ते पुन्हा भाजपच्या जवळ आले आहेत.
इकडे महाराष्ट्रात 2019 ला शिवसेना-भाजपची सत्ता आली. मविआच्या चर्चेनं पहाटेचं 80 तासांचं सरकार बनलं. नंतर 2022 पर्यंत मविआचं सरकार चाललं. शिवसेना फुटून एका गटासोबत भाजपची सत्तावापसी झाली. 2023 ला राष्ट्रवादीच एक गट फुटून सत्तेत गेला. पण सध्या महाराष्ट्रात जी स्थिती ती देशात कुठेही नाही. किंबहुना इतिहासात पहिल्यांदाच अशी राजकीय स्थिती ओढावलीय. म्हणजे भाजप पूर्ण क्षमतेनं अखंडपणे सत्तेत आहे. शिवसेना यूबीटी नावाचा एक गट विरोधात आहे, आणि दुसरा शिवसेना पक्ष सत्तेत. राष्ट्रवादीचा एक गट विरोधात, आणि दुसरा गट सत्तेत बसलाय. त्यात 45 आमदार असणारी काँग्रेस कधीही फुटू शकते, असा दावा भाजप नेते करतायत. पण जर समजा बिहारमध्ये जुन्या सहकाऱ्याला भाजप सोबत घेऊ शकते, तर महाराष्ट्रात ठाकरेंसोबत तसं होऊ शकतं का? तसं झालं तर पुढे काय होईल?याबाबत सध्या फक्त तर्क-वितर्कच बांधले जावू शकतात.