काही दिवसांनी पटोलेच भाजपात येतील, पण आम्ही त्यांना…; गडकरींना मिळालेल्या ऑफरवर भाजपा नेत्याचे प्रत्युत्तर

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती. या ऑफरला आता भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

काही दिवसांनी  पटोलेच भाजपात येतील, पण आम्ही त्यांना...; गडकरींना मिळालेल्या ऑफरवर भाजपा नेत्याचे प्रत्युत्तर
कॉंग्रस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 12, 2022 | 8:19 AM

नागपूर : काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती. नितीन गडकरी यांची जर भाजपमध्ये घुसमट होत असेल तर त्यांनी काँग्रेसमध्ये यावे, असं पटोले यांनी म्हटलं होतं. भाजपाविरोधात बोलणाऱ्यांच्या मागे ईडी, सीबीआय लावली जाते, मात्र काँग्रेस हा लोकशाही मानणार पक्ष असल्याची टीकाही पटोले यांनी केली होती. आता पटोले यांच्या या वक्तव्याचा जोरदार समाचार भाजप नेते संजय कुटे यांनी घेतला आहे.  काही दिवसांनी नाना पटोलेच भाजपमध्ये येतील असा दावा संजय कुटे यांनी केला आहे. मात्र आम्ही त्यांना पक्षात घेणार नसल्याचं देखील ते म्हणाले आहेत.

नेमकं काय म्हणाले कुटे

कुटे यांनी नाना पटोलेंना जोरदार टोला लगावला आहे. नाना पटोले यांची नितीन गडकरींबद्दल बोलण्याची कुवत नाही. काही दिवसांनी नाना पटोले हेच भाजपात येतील. मात्र आम्ही त्यांना पक्षात घेणार नाही तो भाग वेगळा. नाना पटोले यांनी यापूर्वीच भाजप दर्शन घेतले आहे. ते सतत इकडून तिकडे आणि तिकडून इकडे करत असतात. त्यामुळे भविष्यात ते भाजपमध्ये येऊ शकतात. मात्र आम्ही त्यांना पक्षात घेणार नाही असं कुटे यांनी म्हटलं आहे.

नाना पटोले यांनी नेमकं काय म्हटलं होतं?

नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वीच नितीन गडकरी यांना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती. गडकरी यांची भाजपामध्ये घुसमट होत असेल तर त्यांनी काँग्रेसमध्ये यावे. काँग्रेस हा लोकशाही माननारा पक्ष आहे. असं नाना पटोले यांनी म्हटलं होतं. त्यावरून आता संजय कुटे यांनी नाना पटोले यांना टोला लगावला आहे.