मीरा-भाईंदर जैनांची नगरी… भर कार्यक्रमात भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
मीरा-भाईंदरचे भाजप आमदार नरेंद्र मेहता हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. त्यांनी जैन लोकांबाबत केलेल्या विधानाने राज्यातील राजकारण पेटले आहे.

मिरा-भाईंदरचे भाजप आमदार नरेंद्र मेहता हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. नुकताच त्यांनी ठाण्यात परम पूज्य दादा गुरुदेव यांच्या 33 व्या पुण्यतिथी कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात त्यांनी मिरा-भाईंदर जैनांची नगरी असल्याचा दावा केला. त्यांचे हे वादग्रस्त विधान सध्या चांगलेच चर्चेत आहे. या विधानानंतर मनसे आक्रमक झाली आहे. मनसे विधानसभा अध्यक्ष सचिन पोपळेंनी नरेंद्र मेहता यांना चांगलेच सुनावले आहे.
मिरा-भाईंदर जैनांची नगरी असल्याच्या भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या दाव्यावरून राजकीय वाद पेटला आहे. आमदार, महापौर आणि ९ नगरसेवक जैन असल्याचा दाखला देत मेहता आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. सेव्हन स्क्वेअर अकॅडमी स्कूलमधील कांदा-लसूण बंदीवरही त्यांनी प्रतिक्रिया देत ‘जे होईल ते बघून घेऊ’ असे म्हटले होते. आता पुन्हा त्यांनी एका कार्यक्रमात केलेल्या विधानाने वाद पेटला आहे.
मनसेची आक्रमक भूमिका
नरेंद्र मेहता यांना मनसे विधानसभा अध्यक्ष सचिन पोपळे यांनी चांगलेच सुनावले आहे. ‘मिरा-भाईंदर ही आगरी-कोळी आणि मराठी बांधवांची भूमी आहे, वाद वाढवण्याचे उद्योग बंद करा,’ असा इशारा त्यांनी दिला आहे.
यापूर्वी झाला होता वाद
यापूर्वी मिरा-भाईंदरमधील सेव्हन स्क्वेअर अकॅडमी स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या डब्यातील खाद्यपदार्थावरुन वाद पेटला होता. विद्यार्थ्यांना डब्यात कांदा-लसूण, बटाटा, बीट, कंदमुळांच्या भाज्या आणण्यास मनाई केली होती. यावरुन देखील राजकीय वर्तुळात संताप व्यक्त करण्यात आला. आता पुन्हा मिरा-भाईंदर येथील आमदार नरेंद्र मेहता यांनी केलेल्या विधानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. याविरोधात मनसे आक्रमक झाल्याचे देखील दिसत आहे.