मोठी बातमी! एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या, सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर जळगावच्या सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे आता खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या, सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
| Updated on: Feb 11, 2026 | 10:13 PM

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्याविरोधात जळगावच्या सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक तसेच गृहमंत्री यांच्याबद्दल अर्वाच्य भाषा वापरत अरेरावी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यामुळे आता एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. गुन्हा दाखल झाल्याच्या वृत्ताला पोलीस अधिकाऱ्यांकडून दुजोरा देण्यात आला आहे.  सावदा पोलीस स्टेशनमध्ये एका गौण खनिज चोरीच्य प्रकरणात पोलिसांना जाब विचारताना एकनाथ खडसेंनी अर्वाच्च शब्दात अरेरावी केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र दुसरीकडे या संदर्भात फोनवरून माहिती देताना एकनाथ खडसेंकडून त्यांच्याविरोधात तक्रारीत केलेल्या आरोपांचे खंडन करण्यात आले आहे.

नेमकं काय म्हणाले खडसे? 

एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढल्या आहेत, एकनाथ खडसे यांच्याविरोधात जळगावच्या सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक तसेच गृहमंत्री यांच्याबद्दल अर्वाच्य भाषा वापरत अरेरावी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. मात्र एकनाथ खडसे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. ‘गौण खनिज प्रकरणात चौकशीसाठी सावदा पोलीस स्टेशनमध्ये गेलो, मात्र त्यावेळी माझ्याकडून एक चुकीचा शब्द निघाल्याने पोलीस निरीक्षकाची आपण माफी मागितल्याची माहिती एकना खडसे यांनी फोनद्वारे दिली आहे.’

तक्रारीत काय म्हटलं?

या प्रकरणात  सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.  विधानपरीषद सदस्य एकनाथराव गणपतराव खडसे रा. मुक्ताईनगर हे सावदा पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये दाखल झाले, त्यानंतर त्यांनी  तासखेडा ता. रावेर येथील गौणखनिज संदर्भात गुन्हा दाखल का केला नाही ? अशी आमच्याकडे विचारणा केली.  त्यानंतर ते आम्हाला अत्यंत अपमानास्पद बोलले तसेच आमच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा ट्रॅप लावतो अशी धमकी देखील त्यांनी यावेळी दिली, आम्हाला दमदाटी देखील केली, असं या तक्रारीमध्ये म्हटलं आहे. महाराष्ट्र शासनाचे मंत्री यांना अश्लील भाषेत मोठमोठ्याने शिवीगाळ केली, असा आरोप देखील यावेळी खडसेंविरोधात करण्यात आला आहे, या प्रकरणात आता खडसेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात  आला आहे.

दरम्यान माझ्यावर जो गुन्हा दाखल केला आहे तर तो करू द्या, मी कायदेशीर लढेल. सावदा पोलीस स्टेशनला अवैध उत्खनन झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली होती, तरी पोलीस कारवाई करत नव्हते,  आणि मी या संदर्भात अधिवेशनात देखील जाब विचारला होता. माझ्याकडून काही चुकीचे शब्द बोलले गेले, त्याबद्दल मी माफी मागितली आहे, असंही यावेळी खडसे यांनी म्हटलं आहे.