बावनकुळे आमचा हिरा, ते आहे त्यापेक्षा मोठे झालेले दिसतील : मुख्यमंत्री

| Updated on: Oct 18, 2019 | 4:37 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (CM Fadnavis on Chandrashekhar Bawankule) यांची भरभरून प्रशंसा केली.

बावनकुळे आमचा हिरा, ते आहे त्यापेक्षा मोठे झालेले दिसतील : मुख्यमंत्री
Follow us on

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (CM Fadnavis on Chandrashekhar Bawankule) यांची भरभरून प्रशंसा केली. नागपूरमधील प्रचारसभेत बोलत असताना चंद्रशेखर बावनकुळे आमचा हिरा असल्याचं म्हटलं. तसेच त्यांचा आम्ही भविष्यात नक्कीच विचार करु. ते आज जे आहेत त्यापेक्षा नक्कीच मोठे झालेले दिसतील, असंही आश्वासन दिलं. या विधानसभा निवडणुकीत ज्या विद्यमान मंत्र्यांना तिकीट नाकारले गेले, त्यापैकीच एक आहेत. त्यामुळे ते नाराज असल्याचीही चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवरच फडणवीसांनी बावनकुळेंचा (CM Fadnavis on Chandrashekhar Bawankule) असा उल्लेख केल्याचं बोललं जात आहे.

आपल्या भाषणात मुख्यमंत्री फडणवीसांनी महिलांच्या हातात पैसे देण्याची योजना आणणार असल्याचीही घोषणा केली. यावेळी त्यांनी पुरुषांना कोपरखळी लगावली. ते म्हणाले, “पुरुषांच्या हातात पैसा आला की ते खर्रा खातात, व्यसन करतात. मात्र, महिलांच्या हातात आलेले पैसे त्या घरी नेतात. मुलाबाळांवर खर्च करतात. म्हणूनच आम्ही महिलांच्या हातात पैसा देणार आहोत. तशी सरकारी योजनाही आणणार आहोत.”

बंडखोर कधीही निवडून येऊ शकत नाही. बंडखोराला मत म्हणजे काँग्रेसला मत. म्हणूनच कमळाला मतदान करा, असंही आवाहन फडणवीस यांनी केलं.

फडणवीस म्हणाले, “आघाडीच्या 15 वर्षांपेक्षा आम्ही मागील 5 वर्षात दुप्पट कामं केलं. 50 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. आजंही कर्जमाफीची योजना सुरु आहे. 5 वर्षांमध्ये शेतकऱ्यांना 50 हजार कोटी रुपये दिले. ही विधानसभा निवडणूक यापूर्वीच्या निवडणूकीपेक्षा वेगळी आहे. या निवडणुकीत आमचा विजय होईल, हे 5 वर्षांचा मुलगाही सांगतो आहे. काँग्रेसचे यावेळी 24 आमदारही निवडून येणार नाहीत.”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणात राहुल गांधींवरही टीका केली. ते म्हणाले, “राहुल गांधी प्रचार सभेत कुणाबाबत बोलतात हेच कळत नाही. राहूल गांधींची सभा येथे झाली, तर रामटेकचे मल्लीकार्जुन रेड्डी 50 हजार मतांनी निवडून येतील.” यावेळी त्यांनी नागपूर जिल्ह्यातील सर्व 12 जागा निवडून द्या, असेही आवाहन केलं.