Eknath Shinde : ‘मी शिवसेना गटनेता, तर प्रतोद भरत गोगावले’, उद्धव ठाकरेंकडून 12 आमदारांवरील कारवाईच्या मागणीनंतर शिंदेंचं विधानसभा उपाध्यक्षांना पत्र

जास्त आमदार माझ्यासोबत आहे, त्यामुळे अजय चौधरी यांची निवड ही बेकायदेशीर असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

Eknath Shinde : मी शिवसेना गटनेता, तर प्रतोद भरत गोगावले, उद्धव ठाकरेंकडून 12 आमदारांवरील कारवाईच्या मागणीनंतर शिंदेंचं विधानसभा उपाध्यक्षांना पत्र
एकनाथ शिंदे
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jun 23, 2022 | 11:58 PM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाळीनंतर महाविकास आघाडी सरकारवर मोठं संकट ओढावलं आहे. शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीत असलेल्या आमदारांची संख्या आता 49 वर पोहोचलीय. दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या बंडखोर आमदारांना शिवसेनेकडून इशारा देण्यात आलाय. एकनाथ शिंदे यांच्यासह 12 आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांच्याकडे करण्यात आलीय. खासदार अरविंद सावंत आणि अजय चौधरी यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ झिरवळ यांच्याकडे पोहोचलं आणि त्यांच्याकडे 12 आमदारांविरोधात पिटिशन सादर केलं आहे. या पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदे यांनीही स्वत:ला गटनेते आणि भरत गोगावले (Bharat Gogawale) यांना प्रतोद म्हणून नियुक्ती करण्याबाबत झिरवळ यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रासोबत आपल्यासोबत असलेल्या आमदारांच्या स्वाक्षरी असलेला कागदही जोडण्यात आलाय.

एकनाथ शिंदे यांचं विधानसभा उपाध्यक्षांना पत्र

शिंदे गटाच्या 12 आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी

एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार किंवा तो गट शिवसेना पक्षादेशाचं उल्लंघन करत आहेत. त्यामुळे त्यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावं अशी मागणी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यासाठी शिवसेना खासदार अरविंद सावंत, नवनियुक्त गटनेते अजय चौधरी अजून काही आमदार आणि नेते यांच्या शिष्टमंडळानं विधानसभा उपाध्यक्षांची भेट घेटली आहे. शिवसेनेकडून एकूण 12 आमदारांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली आहे.

कुणाची आमदारकी रद्द करण्याची मागणी?

>> एकनाथ शिंदे (कोपरी)

>> तानाजी सावंत (भूम-परंडा)

>> संदीपान भुमरे (औरंगाबाद शहर)

>> संजय शिरसाठ (औरंगाबाद पश्चिम)

>> अब्दुल सत्तार (सिल्लोड)

>> भरत गोगावले (महाड)

>> प्रकाश सुर्वे (मागाठाणे)

>> अनिल बाबर (सांगली)

>> बालाजी किनीकर (अंबरनाथ)

>> यामिनी जाधव (भायखळा)

>> लता सोनावणे (चोपडा)

>> महेश शिंदे (कोरेगाव)

तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही – शिंदे

एकनाथ शिंदे यांच्या गटातील 12 आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आल्यानंतर शिंदे यांनी आता उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलंय. ‘कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो! घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत. 12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत. कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे’, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा थेट उद्धव ठाकरेंना आव्हान दिलंय.