Rajan Salvi : मध्यरात्री महत्त्वाची बैठक, शिवसेनेत प्रवेश करण्याआधी साळवी म्हणाले, ‘एकनाथ शिंदे हे माझे…’

Rajan Salvi : काही दिवसांपासून राजन साळवी हे उद्धव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणार अशी चर्चा रंगली होती. ते भाजपत प्रवेश करतील असा सर्वांचा अंदाज होता. पण राजन साळवी यांनी आपलं मूळ शिवसेनेची निवड केली. तिथे विद्यमान आमदार किरण सामंतही आहेत.

Rajan Salvi : मध्यरात्री महत्त्वाची बैठक, शिवसेनेत प्रवेश करण्याआधी साळवी म्हणाले, एकनाथ शिंदे हे माझे...
Rajan Salvi-Eknath Shinde
| Updated on: Feb 13, 2025 | 9:00 AM

कोकणातील राजापूर विधानसभेचे माजी आमदार राजन साळवी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज दुपारी ठाण्यात हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे. या पक्ष प्रवेशापूर्वी काल रात्री एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार किरण सामंत आणि राजन साळवी उपस्थित होते. या बैठकीनंतर राजन साळवी माध्यमांशी बोलले. मागच्या काही दिवसांपासून राजन साळवी हे उद्धव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणार अशी चर्चा रंगली होती. ते भाजपत प्रवेश करतील असा सर्वांचा अंदाज होता. कारण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा शिवसेना उमेदवार किरण सामंत यांनी पराभव केला होता.

पण राजन साळवी यांनी आपलं मूळ शिवसेनेची निवड केली. तिथे विद्यमान आमदार किरण सामंतही आहेत. स्थानिक पातळीवरील राजकारण लक्षात घेता ही बैठक महत्त्वाची होती. “एकनाथ शिंदे हे माझे पहिल्यापासून गुरु होते. मागच्या काळात त्यांच्यासोबत मी जाऊ शकलो नाही. पण जाण्यासाठी निमित्त लागतं. ते निमित्त लागलं, मी या ठिकाणी आलो. शिंदे साहेबांचा आशिर्वाद घेतला” असं राजन साळवी म्हणाले.

‘शिंदे साहेबांचा आशिर्वाद आवश्यक’

“आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, विद्यमान आमदार किरण सामंत आणि मी अशी एकत्रित बैठक झाली. मतदारसंघ, जिल्ह्यासंबंधी आवश्यक चर्चा झाल्या. सर्व चर्चा सकारात्मक झाल्या. सामंत बंधू आणि मी सुद्धा समाधानी आहे. आम्हा सर्वांना शिंदे साहेबांचा आशिर्वाद आवश्यक आहे” असं राजन साळवी म्हणाले.

‘असं अभिवचन आम्ही शिंदेसाहेबांना दिलय’

“भविष्यात हातात हात घेऊन जिल्हापातळीवर, महाराष्ट्र असेल, आम्ही एकत्र काम करणार असं अभिवचन आम्ही शिंदेसाहेबांना दिलय. उद्या सर्वांच्या उपस्थितीत माझा पक्षप्रवेश आहे, त्यासाठी मी समाधानी आहे” असं राजन साळवी म्हणाले. पत्रकारांनी विनायक राऊत यांच्यासंबंधी प्रश्न विचारताच त्यांनी बोलणं टाळलं. “मी उद्या बोलेन. सामंत बंधू माझ्या समवेत होते. शिंदे साहेबांचा आशिर्वाद घेण्यासाठी आलेलो. चर्चा सकारात्कम झाली. राजन साळवींना कुठे, कसा मानसन्मान देण्याची जबाबदारी शिंदे साहेबांनी घेतली आहे. जे काय बोलायचय ते उद्या बोलू” असं राजन साळवी म्हणाले.