Gokul Election: ‘गोकुळ’वर महायुतीचा झेंडा! विजयानंतर हसन मुश्रीफांची गर्जना, ‘अमुल’चं नाव घेत म्हणाले…
पहिल्या वर्षी राष्ट्रवादीकडे अध्यक्षपद गेले आहे, पुढच्या वर्षी कोणाचा अध्यक्ष करायचा हे आम्ही ठरवू," असं खासदार धनंजय महाडिक यांनी स्पष्ट केले आहे.

Kolhapur Gokul Election 2026: गोकुळ दूध संघ अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्वात मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे. गोकुळच्या दूध संघ अध्यक्षपदी महायुतीचे राजेश पाटील यांची एकमताने निवड झाली आहे. नाट्यमय घडामोडीनंतर गोकुळवर महायुतीने झेंडा फडकवला असून राजेश पाटील हे एका मताने निवडून आले आहेत. या विजयानंतर मंत्री हसन मुश्रीफ, धनंजय महाडिक यांनी जल्लोष करत सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
गोकुळवर महायुतीचा झेंडा, कुणाला किती मते?
“गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडली. या निवडणुकीमध्ये महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेश पाटील यांनी विजय मिळवला आहे. राजेश पाटील यांना १६ मते पडली असून ते नुतन चेअरमन झालेत. भविष्यात साडेपाच लाख शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील. पहिल्या वर्षी राष्ट्रवादीकडे अध्यक्षपद गेले आहे, पुढच्या वर्षी कोणाचा अध्यक्ष करायचा हे आम्ही ठरवू,” असं खासदार धनंजय महाडिक यांनी स्पष्ट केले आहे.
या निवडणुकीमध्ये महायुती अतिरेक करत आहे असं नॅरेटिव्ह पसरवले गेले. याबद्दल राज्य शासनाने काढलेल्या अध्यादेशामुळेच गोकुळच्या कामाकाजाला स्थिरता आली. भविष्यकाळात गोकुळच्या कामकाजाबद्दल शेतकऱ्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होतील, असं आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केले.
हसन मुश्रीफांची गर्जना!
“गोकुळच्या निवडणुकीत दूध संघ अमुलला विकण्याचा घाट घालण्यात येत आहे असा खोटा प्रचार करण्यात आला. मात्र आज आम्ही सांगतो रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आम्ही अमुल वगेरे काही करणार नाही तज्ज्ञ संचालकांनी त्यांच्या सददविवेक बुद्धीने मतदान केलं आहे. सतेज पाटील यांनी त्यांची पुढील रणनिती आखावी, त्यांचा मार्ग मोकळा आहे. कोर्टामध्ये सुनावणी चालू राहील. आमचे संचालक मंडळ दूध उत्पादकांना न्याय देईल,” असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांना थेट इशाराही दिला आहे.