राज्यात उलथापालथ होणार, बड्या नेत्याचं विधान; आता शिंदेंच्या मंत्र्यानेच क्लिअर केलं, एका वाक्याने सस्पेन्स वाढला
मनोज जरांगे पाटील यांच्या ऑडिओ क्लिपवरून राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार असल्याचं गणेश नाईक यांनी म्हटलं होतं. आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत थेट भाष्य केलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या ऑडिओ क्लिपवरून राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होईल असं वक्तव्य भाजपचे नेते गणेश नाईक यांनी केलं होतं त्यानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेच्या बड्या नेत्याने प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव यांनी म्हटलं की, उलथापालथ व्हायला काही तो भूकंप थोडीच आहे. जे व्हायचे असते ते ठरलेले असते आणि जे होईल ते आपण पाहूच, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता सस्पेन्स वाढला आहे. कोणाच्या भविष्य सांगण्यावर किंवा भाकितावर काही होईल, हे मानणारा मी माणूस नाही. जेव्हा सगळेजण मिळून सामूहिक निर्णय घेतात, तेव्हाच उलथापालथ होते, असं गुलाबराव पाटलांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी अर्थखातं आणि दोन्दी पक्षाच्या विलीनीकरणावर म्हणाले….
गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला अर्थखातं परत मिळावं यासाठी पक्षाचे प्रयत्न सुरु असल्याचे समोर येत आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना हे खात देण्यात यावं, अशी भूमिका पक्षाच्या नेत्यांनी मांडलेली पाहायला मिळते. दरम्यान, पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळांनी दिली आहे. पण मंत्रीमंडळाबाबतच्या फेरबदलांच्या चर्चेचं त्यांनी खंडण केलं आहे. यावर बोलताना शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव यांनी म्हटलं की, छगन भुजबळ काय म्हणाले किंवा अर्थखात्याबाबत काय चर्चा झाली, याबद्दल मला माहिती नाही. शेवटी तो त्यांचा निर्णय आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर त्यांनी भाष्य केलं. तो निर्णय माझा निर्णय नाही. सुनेत्राताई पवार आणि शरद पवार साहेब यांचा हा अंतर्गत विषय आहे. त्यांच्या पक्षाने काय निर्णय घ्यावा यावर मी बोलणे उचित ठरणार नाही, असं त्यांनी सांगितलं.
नाना पटोलेंना उत्तर
यावेळी महाविकास आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्याचा कट रचला गेला, नाना पटोले आरोपांचं उत्तर दिलं. त्यांनी म्हटलं की, नानाभाऊंना हे आता तीन वर्षांनंतरच कसे काय सुचत आहे? मला वाटते त्यांनी हे त्याच वेळेस बोलायला हवे होते. आता केवळ नवीन मुद्दे तयार करण्यासाठी ही चाललेली धडपड आहे.