पत्रास कारण की… कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं एकनाथ शिंदे यांना पत्र

| Updated on: Jun 01, 2023 | 8:34 AM

Karnataka CM siddaramaiah wrote Latter to CM Eknath Shinde : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं 'या' कारणासाठी एकनाथ शिंदे यांना पत्र; वाचा सविस्तर

पत्रास कारण की... कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं एकनाथ शिंदे यांना पत्र
Follow us on

मुंबई : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी कर्नाटकातील सध्याच्या परिस्थितीचा उल्लेख केला आहे. सध्या कडाक्याच ऊन आहे. अशात कर्नाटकात पाण्याची गंभीर समस्या आहे. कर्नाटकाच्या उत्तर भागात पाण्याची टंचाई निर्माण झाली असल्याचं सिद्धरामय्या यांनी म्हटलं आहे.

वाढतं ऊन आणि पाण्याची समस्या

सिद्धरामय्या यांनी एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी कर्नाटकातील पाण्याची समस्या मांडली आहे. कर्नाटकातील बेळगाव, विजयपुरा, बागलकोट, कलबुर्गी, याडगिरी आणि रायचूर या जिल्ह्यांमध्ये पाण्याची गंभीर समस्या आहे. या जिल्ह्यांमध्ये मार्चपासूनच पाण्याची कमतरता जाणवत आहे. पिण्याच्या पाण्याची समस्याही अधिक तीव्र होत चालली आहे, असा उल्लेख सिद्धरामय्या यांनी त्यांच्या पत्रात केला आहे.

महाराष्ट्राकडून मदतीची अपेक्षा

सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्रातून मदतीची अपेक्षा व्यक्त केली. कर्नाटकातील सध्याची पाण्याची समस्या पाहता महाराष्ट्र सरकारने मदत करावी. भीमा आणि कृष्णा नदीतून पाणी सोडावं, अशी विनंती सिद्धरामय्या यांनी आपल्या पत्रात केली आहे. या नद्यांमधून पाणी सोडवं, असं या पत्रात म्हणण्यात आलं आहे.

सिद्धरामय्या यांनी मान्सून अन् पावसाचा उल्लेख आपल्या पत्रात केला आहे. मान्सून अजून भारतात दाखल झालेला नाही. पावसाची चिन्हे नाहीत. अशातच कर्नाटकच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये कडक उन्हाळा आहे. शेतीसाठी, लोकांना घरगुती वापरासाठी आणि जनावरांसाठी पाण्याची टंचाई जाणवत आहे. ही समस्या दूर होणं गरजेचं आहे, असं सिद्धरामय्या यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राने मदत करावी. वारणा आणि कोयना नदीतून दोन टीएमसी पाणी सोडण्यात यावं. तसंच उजनी धरणातून भीमाच्या माध्यमातून तीन टीएमसी पाणी कर्नाटकला तात्काळ सोडण्यात यावं. तसे आदेश आपण महाराष्ट्राच्या प्रशासनाला द्यावेत, अशी विनंती, असं सिद्धरामय्या यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. सिद्धरामय्या यांनी एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही उल्लेख केला आहे.