चिमणराव राष्ट्रवादीशी आय लव्ह यू करतात तेव्हा त्यांचं बळ कुठे जाते?; शिंदे गटातील मंत्री आणि आमदाराचं शाब्दिक युद्ध सुरूच

| Updated on: Oct 29, 2022 | 12:31 PM

चिमणराव पाटील हे पारोळा एरंडोल मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांच्या मतदारसंघात गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याच्या मुलाला पाणीपुरवठा योजनेचे काम दिले.

चिमणराव राष्ट्रवादीशी आय लव्ह यू करतात तेव्हा त्यांचं बळ कुठे जाते?; शिंदे गटातील मंत्री आणि आमदाराचं शाब्दिक युद्ध सुरूच
शिंदे गटातील मंत्री आणि आमदाराचं शाब्दिक युद्ध सुरूच
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

जळगाव: शिंदे गटाचा एक मंत्री आणि एक आमदार यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये मानापमान नाट्यावरून जोरदार हल्लाबोल सुरू आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी या दोन्ही नेत्यांशी फोनवरून संपर्क साधून त्यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला आहे. तरीही हे नेते एकमेकांवर तोंडसुख घेताना दिसत आहेत. एकाच जिल्ह्यातील या नेत्यांमधील वादामुळे मुख्यमंत्र्यांची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. वाद सुरू असलेल्या एक मंत्री म्हणजे गुलाबराव पाटील (gulabrao patil) आणि आमदार म्हणजे चिमणराव पाटील (chimanrao patil). या दोन्ही नेत्यांमध्ये सध्या शाब्दिक युद्ध सुरू आहे.

चिमणराव पाटील यांनी टीका केल्यानंतर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी या टीकेचा समाचार घेतला आहे. एकमेकांबरोबर नारळ फोडल्याने जर पक्षाला बळ मिळत असेल तर पारोळा मार्केट कमिटीत राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या उमेदवारांना चिमणराव पाटील बिनविरोध निवडून आणतात. राष्ट्रवादीशी आय लव यू करतात. तेव्हा त्यांचं बळ कुठे जातं? असा जोरदार पलटवार गुलाबराव पाटील यांनी चिमणराव पाटलांवर केला आहे.

हे सुद्धा वाचा

चिमणराव पाटील यांना मीच शिवसेनेत आणले. माझ्या जुन्या मतदारसंघात ते आमदार झाले. त्यावेळी त्यांना घेऊन मी मतदार संघात फिरलो. तेव्हा मात्र कधीही आमच्यात कटूता नव्हती. मात्र एखाद्या नारळ फोडण्यावरून जर राष्ट्रवादीला बळ मिळत असेल तर मी रोज फोडेल, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी चिमणरावांना डिवचलं. या आरोप प्रत्यारोपामुळे शिंदे गटातील आमदार व मंत्र्यांचा वाद हा चव्हाट्यावर आला असून दोघांमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे.

चिमणराव पाटील हे पारोळा एरंडोल मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांच्या मतदारसंघात गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याच्या मुलाला पाणीपुरवठा योजनेचे काम दिले. तसेच या कामाचे उद्गाटनही केले. यावेळी गुलाबराव पाटील यांचा मुलगाही उपस्थित होता. विशेष म्हणजे ज्यांच्या मतदारसंघात हा कार्यक्रम पार पडला त्या चिमणराव पाटील यांना साधं निमंत्रणही देण्यात आलं नाही. त्यामुळे चिमणराव पाटील चिडले आहेत.

राष्ट्रवादीला बळ दिलं जात असल्याच्या आरोपावरून शिवसेनेत बंड केलं. आता आपले मंत्री राष्ट्रवादीला बळ कसे देतात? असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच तुम्ही मंत्री झालात. सरकार तुमची खासगी मालमत्ता नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे.