शिंदेंचा राज-उद्धव दोन्ही बंधूंना मोठा झटका, साडेतीन हजार पदाधिकाऱ्यांना प्रवेश देत ठाकरेंना ललकारलं

| Updated on: Nov 06, 2022 | 5:28 PM

शिवसेना आणि मनसेच्या तब्बल साडेतीन हजार कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला

शिंदेंचा राज-उद्धव दोन्ही बंधूंना मोठा झटका, साडेतीन हजार पदाधिकाऱ्यांना प्रवेश देत ठाकरेंना ललकारलं
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंना आज खूप मोठा झटका दिलाय. कारण शिवसेना आणि मनसेच्या तब्बल साडेतीन हजार कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आज शिंदे गटात प्रवेश केलाय. हे सर्व कार्यकर्ते पालघर, बोईसर आणि डहाणू विधानसभा मतदारसंघातील आहेत. हे सर्व कार्यकर्ते आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल झाले आणि त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी एकनाथ शिंदेंनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर सडकून टीका केली.

“आपण एका विश्वासाने आलेला आहात. त्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही. हे सरकार तुमचं, आमचं सगळ्याचं आहे. सर्वसामान्यांचं हे सरकार आहे. या सरकारमध्ये 170 आमदारांचं मजबूत बहुमत आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“काही लोकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यांच्या छातीमध्ये धडकी भरली आहे. त्यांना पोटशूळ उठलेलं आहे की, तीन महिन्यात हे सरकार एवढं काम करतंय, मग हेच पुढचे अडीच वर्ष चालू राहीलं तर काय परिस्थिती होईल? याची चिंता आणि भ्रांत त्यांच्या मनात निर्माण झालीय”, असा खोचक दावा शिंदेंनी केला.

हे सुद्धा वाचा

“दररोजचा ओघ पाहून सर्वच पक्ष चिंतातूर झाले आहेत. असाच ओघ राहिला तर समोर राहणार काय? त्यामुळे नवीन बातम्या पसरवल्या जात आहेत. मध्यावधी निवडणुका लागतील असं बोलत आहेत. अरे तुमचं लॉजिक काय?”, असा सवाल त्यांनी केला.

“या सरकारकडे 170 आमदारांचं बहुमत आहे. एक मजबूत सरकार या राज्यामध्ये काम करतंय. आम्ही दिवसेंदिवस लोकहिताचे निर्णय घेतोय. जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत. कारण आघाडीतही काही आलबेल दिसत नाहीय”, असा टोला त्यांनी लगावला.