Modi Cabinet Expansion : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागलेल्या नारायण राणेंकडे कोणतं खातं?

| Updated on: Jul 07, 2021 | 11:41 PM

खातेवाटपात नारायण राणे यांच्याकडे सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी सोपवली आहे. राणे यांच्याकडे सोपवलेल्या खात्याचा अतिरिक्त कारभार यापूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे होता.

Modi Cabinet Expansion : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागलेल्या नारायण राणेंकडे कोणतं खातं?
केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे
Follow us on

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टप्प्यातील सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागली आहे. नारायण राणे यांना बुधवारी संध्याकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. त्यानंतर रात्री 10 वाजेच्या सुमारास जाहीर झालेल्या खातेवाटपात नारायण राणे यांच्याकडे सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी सोपवली आहे. राणे यांच्याकडे सोपवलेल्या खात्याचा अतिरिक्त कारभार यापूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे होता. (Narayan Rane has the Ministry of Micro, Small and Medium Enterprises)

राणे यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना कोणतं खातं दिलं जाणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं. यापूर्वी महाराष्ट्राच्या वाट्याला आलेल्या अवजड उद्योग खात्याची जबाबदारीच राणे यांच्याकडे दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, राणे यांना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याचा कार्यभार देण्यात आला आहे. राणे यांनी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर माजी खासदारी निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांनी आनंद व्यक्त केलाय.

नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया –

मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आभारी आहे. त्यांच्यामुळेच मी आज केंद्रीय मंत्री बनलो आहे. पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनात माझ्यावर जी जबाबदारी देण्यात येईल ती योग्यरित्या सांभाळेल. इतक्या वर्षाचा प्रवास दोन वाक्यात सांगणं शक्य नाही. पण आज सांगताना आनंद होतोय की, पहिल्यांदा मुंबई महापालिकेत नगरसेवक झाले. त्यानंतर आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, खासदार आणि आता केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या माध्यमातून महाराष्ट्राला न्याय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन, असं राणे म्हणाले.

‘..फक्त मंत्री केलं हे नक्की’

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर अनेक चढउतार आले, त्याबाबत काय सांगाल असं विचारला आहे. 1999 ला मुख्यमंत्री झालो. त्यानंतर अनेक चढउतार आले. आता मोदींच्या नेतृत्वात हे पद मिळालं आहे. त्यांनी टाकलेला विश्वास सार्थकी लावेन, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केलाय. तसंच शिवसेनेला शह देण्यासाठी तुम्हाला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याची चर्चा असल्याचं एका पत्रकाराने विचारलं. त्यावेळी कुणाला शह देण्यासाठी की अन्य कशासाठी मला मंत्री केलं हे माहिती नाही. फक्त मंत्री केलंय एवढं नक्की, असं मिश्किल उत्तर राणे यांनी यावेळी दिलं.

संबंधित बातम्या :

Modi Cabinet Expansion : मोदींच्या मंत्रिमंडळात नारायण राणेंना मोठं खातं, भारती पवार, कपिल पाटील, भागवत कराड यांच्याकडे कोणती जबाबदारी?

Modi Cabinet Expansion : मोदी मंत्रिमंडळातील नवं खातेवाटप जाहीर, नव्या सहकार खात्याची जबाबदारी अमित शाहांकडे, कोणत्या मंत्र्यांकडे कुठलं खातं?

Narayan Rane has the Ministry of Micro, Small and Medium Enterprises