नाशिक निवडणुकीचा हाय व्होल्टेज ड्रामा, भाच्यासाठी मामाच्या ‘त्या’ फोनकॉलची चर्चा

सत्यजित तांबे यांनी ऐनवेळी अपक्ष उमेदवारी अर्ज का भरला, याचीही कारणं धुंडाळली जात आहेत.

नाशिक निवडणुकीचा हाय व्होल्टेज ड्रामा, भाच्यासाठी मामाच्या त्या फोनकॉलची चर्चा
Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: Jan 13, 2023 | 1:03 PM

नाशिकः विधान परिषदेच्या (MLC Election) नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा हाय व्होल्टेज ड्रामा सध्या राजकीय वर्तुळाच्या केंद्रस्थानी आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या कालच्या अखेरच्या दिवशी अत्यंत नाट्यमय घडामोडी घडल्या. अखेरच्या क्षणापर्यंत भाजपने (BJP) पत्ते उघड केले नाहीत आणि काँग्रेसला पक्षातूनच मोठा झटका बसला. या सर्व धामधुमीत चर्चा सुरु आहे ती भाच्यासाठी मामाने केलेल्या एका फोन कॉलची.  भाजपने अखेरपर्यंत उमेदवारी दिली नाही. पण काँग्रेसच्या सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी अखेरच्या क्षणी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आणि भाजपची खेळी उघडकीस आली.

सत्यजित तांबे भाजपमध्ये प्रवेश करतील आणि भाजप त्यांना उमेदवारी देईल, अशा चर्चा रंगू लागल्या. या चर्चांमुळे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सत्यजित तांबेंच्या भाजप प्रवेशाला खिळ घालण्यासाठी पुढाकार घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे हे मामा-भाचे आहेत. सत्यजित तांबे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्यानंतर थोरात यांनी भाजप नेत्याला फोन केला. हा प्रवेश थांबवण्याची विनंती केल्याचंही सांगण्यात येतंय…

बाळासाहेब थोरात यांच्या कन्याही भविष्यात राजकारणात येणार अशी चर्चा आहे. त्यामुळे भविष्यातील कौटुंबिक कलह थांबवण्याकरिता थोरातांनी पुढाकार घेतला असावा, अशी चर्चा आहे.

भाच्याने सर्वांनाच मामा बनवलं?

सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. आता ते भाजपकडे पाठिंब्याची मागणी करणार आहेत. सत्यजित तांबे यांनी मामा बाळासाहेब थोरात यांना तसेच काँग्रेस नेतृत्वालाही विश्वासात न घेता हा निर्णय घेतला. त्यामुळे भाच्याने सर्वांनाच मामा बनवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

AB फॉर्म कोरा होता?

सत्यजित तांबे यांनी ऐनवेळी अपक्ष उमेदवारी अर्ज का भरला, याचीही कारणं धुंडाळली जात आहेत. काँग्रेसकडून सत्यजित तांबे यांना उमेदवारी देण्यात आली असती तर एबी फॉर्मवर त्यांचे नाव लिहून आले असते. पण हा फॉर्म कोराच आला होता, असा आरोप केला जातोय. त्यामुळे सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्येच मतभेद होते की काय, अशी चर्चा रंगली आहे.

तर एबी फॉर्म कोरा होता की नाही, हा सर्वस्वी पक्षाचा प्रश्न आहे. सत्यजित तांबे यांनी पक्षाला धोका दिला, भाजपने या खेळाला पाठिंबा दिला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्य नाना पटोले यांनी दिली आहे.

सत्यजित तांबे आता सर्वच पक्षांना मतदानासाठी पाठिंबा मागणार आहेत. मात्र काँग्रेसतर्फे सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिला जाणार नाही, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.