अमोल कोल्हेंच्या उमेदवारीला विलास लांडेंचा विरोध, राष्ट्रवादीत गटबाजी

| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

पुणे: शिवसेनेतून राष्ट्रावादी काँग्रेसमध्ये  प्रवेश केलेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना पुन्हा एकदा नव्या वादाला सामोरे जावं लागत आहे. अमोल कोल्हेंच्या राष्ट्रावादी प्रवेशाने पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली आहे. माजी आमदार विलास लांडे समर्थकांनी अमोल कोल्हेंच्या प्रस्तावित उमेदवारीला विरोध केला आहे. अमोल कोल्हे यांना शिरुर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली, तर आम्ही काम करणार नाही, असा इशारा […]

अमोल कोल्हेंच्या उमेदवारीला विलास लांडेंचा विरोध, राष्ट्रवादीत गटबाजी
Follow us on

पुणे: शिवसेनेतून राष्ट्रावादी काँग्रेसमध्ये  प्रवेश केलेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना पुन्हा एकदा नव्या वादाला सामोरे जावं लागत आहे. अमोल कोल्हेंच्या राष्ट्रावादी प्रवेशाने पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली आहे. माजी आमदार विलास लांडे समर्थकांनी अमोल कोल्हेंच्या प्रस्तावित उमेदवारीला विरोध केला आहे. अमोल कोल्हे यांना शिरुर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली, तर आम्ही काम करणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी दिला.  शिरुर येथील स्थानिक कार्यकर्त्यांनी अमोल कोल्हेंना विरोध करत विलास लांडे यांनाच तिकीट देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

शिरुर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आजपर्यंत सलग तीनवेळा खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेकडून लोकसभेवर निवडून गेले आहेत. हा मतदारसंघ जिंकण्यासाठी राष्ट्रवादीकडून आता अमोल कोल्हे यांना उतरवणार असल्याचे सांगितलं जात आहे.जर तसं झालं तर शिरुरमध्ये तगडी लढत पाहायला मिळू शकते.

मात्र विलास लांडे समर्थकांनी शिवसेनेतून आलेल्या अमोल कोल्हेंना लोकसभेचं तिकीट देण्यास विरोध केला आहे. “आम्हाला उपरा उमेदवार नको. विलास लांडे यांना उमेदवारी द्या”, असा हट्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

अमोल कोल्हेंना या मतदारसंघात तिकीट मिळण्याच्या शक्यतेमुळे लांडे समर्थक तसेच नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी बंडाचं हत्यार उपसलं आहे. इतकंच नाही तर अजित पवारांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित करत लांडे समर्थकांनी नाराजी व्यक्त केली.

सध्या शिरुर मतदारसंघात तणावाचे वातावरण आहे. शरद पवार यांनी चार महिन्यापूर्वी “काम करण्यास सुरुवात करा, कामाला लाग”,असं विलास लांडे यांना सांगितले होते. मात्र अजित पवार आता आमच्यासोबत राजकारण करु पाहत आहेत, असा कार्यकर्त्यांचा आरोप आहे.

कोल्हे-आढळरावांमध्ये शाब्दिक चकमक

सध्या शिरुर मतदार संघात अमोल कोल्हे आणि शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध पाहायला मिळत आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस अमोल कोल्हेंना मराठा म्हणून नाही तर माळी म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरवत आहे अशी टीका शिवसेनेच्या आढळराव पाटील यांनी केली होती. या टीकेला उत्तर देताना अमोल कोल्हे यांनी माझी जात विचारु नका मी शिवरायांचा मावळा आहे असं म्हटलं.

“माझी जात आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा या तीन अक्षरामध्ये अठरा पगड जातींचा समावेश होतो, या तीन अक्षरी शब्दांमध्ये सगळ्या पंथांचा, सगळ्या प्रांतांचा समावेश होतो आणि हा तीन अक्षरी शब्द एकच प्रेरणा देतात ती म्हणजे राष्ट्रप्रेमाची”, असं उत्तर अमोल कोल्हेंनी शिवाजीराव आढळराव यांना दिले होते.

 

संबधित बातम्या : आढळराव, माझी जात लिहून घ्या…: अमोल कोल्हेंचा हल्लाबोल