Shivsena MLA | उस्मानाबादेत तानाजी सावंतांच्या समर्थनार्थ शिवसेना रस्त्यावर, हजारो कार्यकर्त्यांचं शक्तिप्रदर्शन

| Updated on: Jun 27, 2022 | 1:22 PM

आमदार सावंत यांनी घेतलेला निर्णय योग्य असून जिल्ह्यात निष्ठावंत शिवसैनिक व पदाधिकारी यांचे स्वकीयसह विरोधक असलेल्या राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाने कसे खच्चीकरण केले याचा पाढा शिवसैनिकांनी वाचून दाखवला

Shivsena MLA | उस्मानाबादेत तानाजी सावंतांच्या समर्थनार्थ शिवसेना रस्त्यावर, हजारो कार्यकर्त्यांचं शक्तिप्रदर्शन
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

उस्मानाबादः शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांना एकीकडे विरोध आहे. तर दुसरीकडे उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथे त्यांच्या समर्थनार्थ हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. शिवसैनिकांनी (ShivSainik) सावंत यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करीत मोठे शक्तिप्रदर्शन केले. उस्मानाबाद जिल्ह्यातील (Osmanabad) भूम शहरात मोठी रॅली काढून घोषणा दिल्या. सावंत यांना मंत्रिपद मिळाले नाही तसेच स्थानिक राष्ट्रवादी त्रास देत असल्याच्या व्यथा शिवसैनिक व समर्थकांनी मांडल्या . सावंत जो निर्णय घेतील त्याच्या पाठीशी राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. तुम्ही बांधाल ते तोरण, तुम्ही सांगाल ते धोरण, आम्ही सदैव तुमच्या सोबतचा हुंकार देत हे कार्यकर्ते एकवटले व रस्त्यावर उतरले.

राष्ट्रवादीने खच्चीकरण केल्याचा आरोप

आमदार सावंत यांनी घेतलेला निर्णय योग्य असून जिल्ह्यात निष्ठावंत शिवसैनिक व पदाधिकारी यांचे स्वकीयसह विरोधक असलेल्या राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाने कसे खच्चीकरण केले याचा पाढा शिवसैनिकांनी वाचून दाखवला. डॉ तानाजी सावंत यांनी भूम परंडा वाशी सह उस्मानाबाद यवतमाळ मतदार संघात कोट्यावधी रुपये खर्च करुन शिवजल क्रांतीच्या माध्यमातून जलसिंचन व जलसंधारण याची कामे केली. सामूहिक विवाह सोहळे, आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबाचे पालक्तव स्वीकारून त्यांच्या कुटुंबाला आर्थिक, शैक्षणिक मदत करीत आधार दिला. अनेक मुलांना शिक्षण व नौकरीची संघी दिली यासह अनेक विकासकामे स्वखर्चाने सामाजिक मदत करण्याच्या भूमिकेतून केली हे सांगितले.

पालकमंत्र्यांविरोधात खदखद

उस्मानाबादच्या पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी शिवसैनिक यांच्यासह पदाधिकारी यांच्याकडून विकास कामे मंजूर करुन देण्यासाठी 10 टक्के अशी टक्केवारी घेतली, अनेक तालुक्यातील कामे जाणीवपूर्वक नामंजूर केली. गडाख हे अपक्ष निवडून आले असताना त्यांना शिवसेनाच्या कोट्यातून पक्ष प्रवेश न करता थेट रातोरात कॅबिनेट मंत्री केले तसेच उस्मानाबादचे पालकमंत्री म्हणून लादले, गडाख हे केवळ झेंडा फडकवायला उस्मानाबाद येथे आले त्यांनी शिवसैनिकांना न्याय देण्याचे काम केले नाही उलट गटबाजी वाढविली. राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी जाणीवपूर्वक डॉ तानाजीराव सावंत यांना मंत्रिपद मिळू दिले नाही. परंडा मतदार संघातील अनेक कामे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी होऊ दिली नाहीत व खोडा घातला असा आरोप शिवसैनिकांनी केला. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत,भूमचे नेते संजय नाना गाढवे,शिवसेनेचे जिल्हा समन्व्यक तथा माजी सभापती दत्ता साळुंके,परंडा तालुका प्रमुख अण्णा जाधव, युवासेनेचे परंडा तालुका प्रमुख राहुल डोके, माजी उपसभापती बालाजी गुंजाळ,ज्येष्ठ नेते अण्णासाहेब देशमुख, महिला आघाडीच्या अर्चना दराडे उपस्थित होत्या..

‘छावा’ कडून  राऊतांच्या  फोटोला काळे

उस्मानाबाद येथे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या फोटोला काळे फासत जोडे मारले.उस्मानाबादेत छावा संघटना तानाजी सावंत याच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरली . राऊत यांनी सावंत व मराठा समाजाची बदनामी केल्याने छावा कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सावंत यांना राऊत यांनी सूर्याजी पिसाळ उपमा दिल्याने राऊत विरोधात आंदोलन करण्यात आले. सावंत यांनी मराठा आरक्षण आंदोलनात महत्वाची भूमिका बजावली त्यामुळे त्यांना काही उपमा देऊन राऊत यांनी मराठा समाजाचा अपमान केल्याचे कार्यकर्ते यांनी सांगितले.