पुण्यातील भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर यांना कोरोनाचा संसर्ग

| Updated on: Jul 05, 2020 | 12:13 PM

दोन दिवसापूर्वी ताप आणि कणकण आल्याने कोविड तपासणी केली असता माजी आमदार योगेश टिळेकर यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. (Pune Hadapsar Ex BJP MLA Yogesh Tilekar Corona Positive)

पुण्यातील भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर यांना कोरोनाचा संसर्ग
Follow us on

पुणे : हडपसरमधील भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. टिळेकर यांनी स्वतः ट्वीट करत माहिती दिली. योगेश टिळेकर यांची प्रकृती स्थिर असून सध्या त्यांच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Pune Hadapsar Ex BJP MLA Yogesh Tilekar Corona Positive)

दोनच दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या भाजपच्या राज्य कार्यकारीणीत टिळेकर यांची ओबीसी आघाडीच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे.

“दोन दिवसापूर्वी ताप आणि कणकण आल्याने माझी व मुलाची कोविड तपासणी करुन घेतली असता तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला. माझी प्रकृती स्थिर आहे. तुमच्या आशिर्वादामुळे लवकरच बरा होऊन येईन. आपण सर्वांनी काळजी घ्यावी व सुरक्षित राहावे.” असे आवाहन टिळेकर यांनी केले आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी योगेश टिळेकर यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली.

दरम्यान, कोल्हापुरात आमदाराच्या घरातील चौघांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे. विद्यमान आमदाराचा मुलगा, सून, नातवासह नोकराला कोरोना संसर्ग झाला. आमदाराच्या घरातच चौघे कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. चौघांवर उपचार सुरु करण्यात आले आहेत.

पुण्याचे महापौर कोरोनाच्या विळख्यात

दुसरीकडे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्वतः याबाबत ट्विट करत माहिती दिली. मुरलीधर मोहोळ यांना ताप आल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. शनिवारी (4 जुलै) सायंकाळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत महापौरांसह पाच नगरसेवकांना आणि एका उपायुक्तांना कोरोनाची बाधा झाली आहे. मात्र उर्वरित चारही नगरसेवक कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यातील मंत्री, आमदारांना कोरोनाची लागण

राज्यात यापूर्वी काही मंत्री आणि आमदारांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. सर्वात आधी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मग सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची बाधा झाली होती. या सर्वांनी कोरोनावर यशस्वी मात केली.

नाशिकमधील राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांना कोरोनाची लागण झाली होती. तर नांदेडच्याही एका आमदाराला कोरोना झाला होता. अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या विद्यमान आमदाराला कोरोनाची लागण झाली आहे.

पिंपरी चिंचवडचे भाजप आमदार महेश लांडगे आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. तर भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर, मिरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. (Pune Hadapsar Ex BJP MLA Yogesh Tilekar Corona Positive)