वाझे, ठाकरे, अंबानी संबंधावर ‘राज’ की बात; राज ठाकरेंना नेमकं काय म्हणायचंय?

| Updated on: Mar 21, 2021 | 12:46 PM

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संबंधावर आणि उद्धव ठाकरे आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या संबंधावर भाष्य केलं आहे. (Raj Thackeray reaction on parambir singh letterbomb)

वाझे, ठाकरे, अंबानी संबंधावर राज की बात; राज ठाकरेंना नेमकं काय म्हणायचंय?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संबंधावर आणि उद्धव ठाकरे आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या संबंधावर भाष्य केलं आहे. तसेच वाझे यांनी अंबानीच्या घरासमोर स्फोटकांची गाडी ठेवली असून कुणाच्या इशाऱ्यावर वाझे असं करतील काय? असा सवालही राज यांनी म्हटलं आहे. राज यांनी बातो बातो में बरच काही सांगितल्याने त्यांचा नेमका रोख कुणाच्या दिशेने आहे, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. (Raj Thackeray reaction on parambir singh letterbomb)

राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचं पत्रं, अँटालिया येथे पार्क करण्यात आलेली स्फोटकांची कार या अनुषंगाने भाष्य केलं. या पत्रकार परिषदेत त्यांनी कोणंतही राजकीय भाष्य केलं नाही किंवा राजकीय मागणीही केली नाही. त्यांनी थेट या प्रकरणाच्या मुळापर्यंत जात काही प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नातून त्यांचा सर्व रोख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच दिशेने होता. त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांचं नाव घेतलं नाही. परंतु मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर संशय निर्माण करणारे अनेक प्रश्न निर्माण केल्याने अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहे. तसेच त्यांनी या प्रकरणात थेट केंद्राच्या हस्तक्षेपाची मागणी करून ठाकरे सरकारची कोंडीही केली.

पहिला रोख

सचिन वाझे हा मुख्यमंत्र्यांचा अत्यंत जवळचा होता. वाझेंना शिवसेनेते प्रवेश करण्यासाठी कोण घेऊन गेलं होतं, हे अजूनही बाहेर आलेलं नाही. वाझेंना पुन्हा पोलीस दलात घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आग्रह धरला होता. फडणवीसांनीच हे सांगितलं आहे. याचा अर्थ एवढाच की वाझे हे उद्धव ठाकरेंच्या जवळचे होते, असं सांगत राज यांनी बिटविन द लाईन अनेक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

दुसरा रोख

उद्धव ठाकरे आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांचे मधूर संबंध आहेत. उद्धव यांच्या शपथविधीला अंबानी कुटुंब सहपरिवार हजर होते. मग वाझे बॉम्बची गाडी कुणी सांगितल्याशिवाय अंबानीच्या घराखाली ठेवेल काय? असा सवाल राज यांनी केला. अंबानीकडून पैसे वसूल करण्यासाठी हे सर्व प्रकरण घडवून आणल्याचं बोललं जात आहे. ठाकरे आणि अंबानी यांचे मधूर संबंध पाहता कोणता पोलीस अंबानींकडे पैसे मागायला जाईल आणि अंबानी सारख्या बड्या असामीकडून पैसे काढणं एवढं सोपं आहे का?, असा सवाल त्यांनी केला आहे. त्यातून त्यांना अंबानी यांच्या घराखाली स्फोटकांची गाडी ठेवण्यामागचं गौडबंगाल काय? याकडे जनतेचं लक्ष वेधायचं असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

तिसरा रोख

यापूर्वी अतिरेकी बॉम्ब ठेवतात असं ऐकलं होतं. आता पोलीसच बॉम्ब ठेवत असल्याचं उघड झालं आहे. ही धक्कादायक बाब आहे. कुणाच्या तरी सांगण्यानुसार वाझे हे कृत्य करतील का? पोलिसांना कुणाच्या तरी सूचना असल्याशिवाय पोलीस हे धाडसच करणार नाही, असंही ते म्हणाले. राज यांच्या या भाषणाचे सर्व मुद्दे एकत्र करता त्यांचा रोख हा संपूर्णपणे मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या दिशेनेच आहे. वाझे हे मुख्यमंत्र्यांचे अत्यंत जवळचे असून त्यांच्या सांगण्यापलिकडे ते काहीच करणार नाही, असं राज यांना सूचवायचं असून त्यातून त्यांना अनेक इशारे करायचे असल्याचंही सूत्रांचं म्हणणं आहे. (Raj Thackeray reaction on parambir singh letterbomb)

संबंधित बातम्या:

VIDEO: वाझे हा मुख्यमंत्र्यांच्या जवळचा, केंद्राने चौकशी केल्यास फटाक्यांची माळ लागेल : राज ठाकरे

सचिन वाझेंना शिवसेनेत आणणारा ‘तो’ नेता कोण; राज ठाकरेंचा थेट सवाल

रमबीर सिंगची बदली का केली, चौकशी का केली नाही? राज ठाकरेंचा सवाल

(Raj Thackeray reaction on parambir singh letterbomb)