मुक्ताईनगरच्या अंगणात सासरे विरुद्ध सून, ग्रामपंचायत निवडणुकीत रक्षा खडसेंचं एकनाथ खडसेंना आव्हान

| Updated on: Jan 15, 2021 | 8:10 PM

मुक्ताईनगरमध्ये (Muktainagar) 51 ग्रामपंचायतींच्या निवडणुका (Gram Panchayat elections) आहेत. यामध्ये रक्षा खडसे विरुद्ध एकनाथ खडसे अशी स्थिती तयार झाली आहे.

मुक्ताईनगरच्या अंगणात सासरे विरुद्ध सून, ग्रामपंचायत निवडणुकीत रक्षा खडसेंचं एकनाथ खडसेंना आव्हान
Follow us on

जळगाव : भाजपला सोडचिठ्ठी देत एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) राष्ट्रवादी काँग्रेसचं (NCP) घड्याळ मनगटावर बांधलं.  मात्र, त्यांचीच सून असलेल्या रक्षा खडसेंनी (Raksha Khadse) हातातलं कमळ काही सोडलेलं नाही. आणि त्यामुळंच आता मुक्ताईनगरमध्ये सासरे विरुद्ध सून अशी परिस्थिती तयार होण्याची शक्यता आहे. आणि याला ग्रामपंचायत निवडणुका कारणीभूत ठरु शकतात. मुक्ताईनगरमध्ये (Muktainagar) 51 ग्रामपंचायतींच्या निवडणुका (Gram Panchayat elections) लागल्या आहेत. आणि यामध्ये ग्रामपंचायती जिंकण्याची जबाबदारी भाजपकडून (BJP) रक्षा खडसेंवर असेल, तर राष्ट्रवादीसह महाविकास आघाडी एकत्र लढली तर ती जबाबदारी एकनाथ खडसेंवरच येणार आहे. त्यामुळंच या निवडणुकीत चुरस वाढलीय. (Raksha Khadse against Eknath Khadse in Muktainagar Gram Panchayat elections)

 

खडसे भाजपत असताना ग्रामपंचायतींवर निर्विवाद वर्चस्व

एकनाथ खडसे भाजपमध्ये असताना जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात होत्या. चंद्रकांत पाटलांच्या रुपानं शिवसेनेचा कडवा विरोध एकनाथ खडसेंना होता. मात्र, आता खडसेच राष्ट्रवादीत आल्यानं आणि महाविकास आघाडीची सत्ता राज्यात असल्यानं हा विरोधही कमी झाला आहे. त्यामुळं मुक्ताईनगरमध्ये भाजप कमकुवत झाल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.

 

मुक्ताईनगरच्या ग्रामपंचायतींचं गणित

जळगावातील 783 ग्रमपंचायतींच्या निवडणुका होत आहेत, त्यात मुक्ताईनगरच्या 51 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. एकनाथ खडसे भाजपमध्ये असताना मागील निवडणुकांत  48 ग्रामपंचायतींवर कमळ उमललं होतं. मात्र, आता कमळ उमलवणाऱ्या खडसेंच्य हाती राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ आलं आहे. त्याचा फटका भाजपला बसण्याची दाट शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. 15 जानेवारी 2021 ला इथं ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे.

 

मुक्ताईनगरमधील ग्रामपंचायत निवडणुकीवर काय म्हणाल्या रक्षा खडसे?

मुक्ताईनगरमधील ग्रामपंचायतीबाबत भाजप खासदार आणि एकनाथ खडसेंची सून असलेल्या रक्षा खडसेंनी टीव्ही 9 मराठीकडे प्रतिक्रीया दिली, त्या म्हणाल्या,  “भाजपची खासदार असल्यामुळे ग्रामपंचायतीत भाजपचे जास्तित जास्त उमेदवार निवडून यावे, असेच माझे प्रयत्न राहणार आहेत. नाथाभाऊ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न करतील,पण मला विश्वास आहे की इथं गावागावात भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत, आणि त्यामुळंच भाजपचे सर्वाधिक उमेदवार निवडून येतील”

 

खडसेंच्या गावातही ग्रामपंचायतीची निवडणूक

एकनाथ खडसे हे मूळचे मुक्ताईनगरमधील कोथळी या गावचे. त्यांच्या गावातही यंदा निवडणुकी लागल्या आहेत. आतापर्यंत खडसेंच्याच पक्षाला या गावानं निवडल्याचा इतिहास आहे. त्यामुळं आधी भाजपनं इथं सत्ता मिळवली. मात्र, यंदा ही सत्ता राष्ट्रवादी आणि महाविकासच्या पारड्यात जाणं निश्चित मानलं जातं आहे. मात्र, त्यातच रक्षा खडसेही इथं जोर लावणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळं ही निवडणूक चुरशीची होणार आहे.

 

मुक्ताईनगरमध्ये गिरीश महाजन संकटमोचक ठरणार?

भाजप संकटात असताना संकटमोचक म्हणून अवतरणारे गिरीश महाजन यंदा जळगावात आपला चांगला जोर लावणार आहे. गिरीश महाजन हेही जळगावचेच असल्यानं त्यांच्या काही भागात चांगला प्रभाव आहे. मात्र, मुक्ताईनगरचा विचार केला तर एकनाथ खडसेंचं पारडं जड ठरतं. म्हणूनच रक्षा खडसे आणि गिरीश महाजन हे दोघेही इथं जोर लावलीत. राष्ट्रवादीकडून इथं अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुकी बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी गाव दत्तक घेण्याचीही योजना घोषित करण्यात आली आहे. याचाही फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे. एकनाथ खडसेंनी पक्ष सोडल्यानं काही नुकसान होत नाही असं अनेकदा भाजपकडून सांगण्यात आलं. पण जमिनीवर एकनाथ खडसेंची ताकद मोठी आहे. त्यातच त्यांना कडवी झुंज देणाऱ्या शिवसेनेचे चंद्रकांत पाटीलही महाविकाससाठी जोर लावतील. त्यामुळंच जळगावात महाविकास आघाडीविरुद्धचा हा सामना भाजपसाठी जिकीरीचा ठरणार आहे.

 

पाहा व्हिडीओ:

 

संबंधित बातम्या:

मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंना ‘ईडी’कडून चौकशीची नोटीस

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाऊनही का म्हणतायत ‘मी घरी बसून’?

(Raksha Khadse against Eknath Khadse in Muktainagar Gram Panchayat elections)